सरकारने शेतकर्यांचा अंत पाहू नये; धनंजय मुंडे यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 02:24 PM2018-02-14T14:24:22+5:302018-02-14T15:18:14+5:30
सरकारने शेतकर्यांचा अंत पाहु नये, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज गारपीटग्रस्त भागाचा पाहणी दौरा करताना दिला.
जालना : शहराहसह जिल्ह्याच्या विविध भागांत रविवारी झालेल्या गारपीटीमुळे नुकसानीचे ४८ तासात पंचनामे करण्याची घोषणा सरकारने केली. प्रत्यक्षात ७२ तास उलटुनही पंचनाम्यास अद्याप सुरूवातही नाही. सरकारने शेतकर्यांचा अंत पाहु नये, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज गारपीटग्रस्त भागाचा पाहणी दौरा करताना दिला.
रविवारी झालेल्या गारपीट आणि वादळी वार्याने राज्यातील मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधील शेती पिकांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असुन, जालना जिल्ह्यातील जालना व मंठा तालुका गारपीटीमुळे सर्वात जास्त प्रभावित झाले आहेत. या तालुक्याचा आज धनंजय मुंडे यांनी दौरा करून पाहणी केली.अनेक शेतीपिकांचे, फळबागांच्या नुकसानीची माहिती त्यांनी शेतकर्यांशी संवाद साधुन जाणुन घेतली. सरकारने ४८ तासात पंचनामे करण्याचे जाहिर केले असले तरी ७२ तासा नंतरही पंचनाम्याला सुरूवात झाली नसल्याची तक्रार अनेक शेतकर्यांनी यावेळी मुंडेंशी बोलतांना केली. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी १० मिनीटांचा धावता दौरा करतांना आमच्या शेतांची साधी पाहणी ही न करता पळ काढल्याबद्दलही अनेक शेतकर्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
सरसकट मदत करावी
यावेळी मुंडे म्हणाले की, आपण शेतकर्यांच्या पाठिशी असुन, शेतकर्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळवुन देण्यासाठी सरकारशी संघर्ष करू. निसर्गाने शेतकर्यांवर आस्मानी तर सरकारने सुलतानी संकट आणले आहे. शेतकर्यांचा अंत पाहु नका आज पिके उद्धवस्त झाले आहेत. शेतकर्यांना आधार न दिल्यास शेतकरी ही उदध्वस्त होईल, अशी भिती व्यक्त केली. किती क्षेत्रावर कोणते नुकसान झाले आहे. याचे आकडे सरकारकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे पंचनामे, बैठका आणि आढावा यांचा फार्स न करता सरसकट मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या समवेत पंकज बोराडे, निसार देशमुख, बबलु चौधरी, बळीराम कडपे, अॅड.संजय काळबांडे आदी उपस्थित होते.