मराठ्यांचे मतदान घेतले, आता सरकार आमच्या नाही तर भुजबळांच्या संपर्कात: मनोज जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 11:33 AM2024-07-22T11:33:50+5:302024-07-22T11:36:45+5:30
मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणाचा मनोज जरांगे यांचा आजचा तिसरा दिवस
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना): सरकारला मराठ्यांची कधीच गरज नव्हती त्यांना फक्त मराठा मतदान हवं आहे ते आता कशाला संपर्क करतील, ते फक्त भुजबळांशी संपर्क करतील. भुजबळ मराठ्यांच्या गावात रॅली काढतील. काय माहिती आरक्षणावर चर्चा करतात की दंगली लावतात, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर केली.
बेमुदत उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमाची संवाद साधला. यादरम्यान तब्बेत बरी आहे, शरीर बर आहे, अशी प्रतिक्रिया दिली. तेच पाढे गिनू नका एकदा दिलं तुम्ही तेही घातलं देतो देतो घेतो घेतो असंच तुमचं सरकार आहे. मोदी शिर्डीत आले होते, तेव्हा त्यांच्याकडून अपेक्षा होती. शहा यांना चेहराच फक्त माणसाचा आहे गरिबांचे मुडदे पाडणारे लोक आहेत. मोठ्या जाती एकत्र आल्यावर काय होईल हे त्यांना कळेल, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी अमित शहा यांच्यावर केली. फडणवीस यांच नाही म्हणणं आहे, तुमचं काय म्हणणं आहे. आरक्षण ओबीसी कोट्यातून द्यायचं की नाही, तुम्ही हो म्हणून सांगा आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू, दोघांपैकी एक हो म्हणा आम्ही यावेळी बरोबर करू, असे फडणवीस यांना उद्देशून जरांगे यांनी टोला लगावला.
गोड बोलून काटा काढू नका जरांगेचा प्रसाद लाड यांना इशारा
राजकारण्यांच्या आरोपावर मी काही काय बोलू? १० महिन्यापासून आम्ही आमचं आरक्षण मागतोय. आम्ही सारख हेच म्हणत आहे. आरक्षण द्या आम्ही राजकारण करणार नाही पण तुम्ही देत नाही त्यामुळे आम्हाला तुम्हाला पाडून तिथे बसावं लागेल. तुमची राजकारणाची जात. गचाळ लोक आहात तुम्ही, सरकारला सांगा ना जीआर काढा. भाऊ म्हणून काड्या करू नका, आतून ट्रॅप रचू नका, आमच्या विरोधात एकेक उतरू नका, गोड बोलून काटा काढू नका, असा इशारा जरांगे यांनी आमदार प्रसाद लाड यांना दिला.
ओबीसी यात्रेवरुन भुजबळांवर सुनावले
चांगलं आहे भुजबळांना तेवढंच एक काम आहे. भुजबळ शिवाय यांचं पान देखील हालत नाही. ओबीसी आरक्षणाला कोणता धक्का लागतो? धनगर, वंजारी यांच्या आरक्षणाला कोणता धक्का लागतो? आम्ही आरक्षणात गुंतलेलो आहे एक दिवस मोकळे होऊच आम्ही. तुम्ही विनाकारण आमच्याशी भांडण विकत घेऊ नका. तुम्ही विनाकारण कोणताही अर्थ काढू नका. आम्ही तुमच्या समाजाचा आदर करतो आणि ते म्हणतात आम्हाला घाबरता तुम्ही. आमच्याकडे रॅली काढून छगन भुजबळ हे शंभर टक्के दंगली घडवून आणणार. जर मी नाशिकला येवल्यात उपोषण सुरू केल्यावर, तुम्हाला किती वाईट वाटेल. माझ्या आता हे डोक्यातच आहे, असेही जरांगे भुजबळ यांना उद्देशून म्हणाले.