रस्त्याची पोलखोल, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकारला जाग; केंद्रीय पथकाकडून पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 07:18 PM2023-06-03T19:18:07+5:302023-06-03T19:18:53+5:30
सुमार दर्जाच्या रस्त्याची लक्तरे वेशीवर टांगल्यानंतर आता प्रशासनाला जाग आली आहे.
हस्तपोखरी (जालना ): अंबड तालुक्यातील हस्तपोखरी ते कर्जत या मॉडेल रस्त्याच्या दर्जाची नुकतीच पोलखोल झाली. जर्मन तंत्रज्ञानाने तयार करण्यात येत असलेल्या या रस्त्याची दुरवस्था व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून सामोर आल्यानंतर आता केंद्र आणि राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. शनिवारी केंद्रीय पथकाकडून रस्त्याची तपासणी करण्यात आली.
हस्तपोखरी ते कर्जत या ९.३ किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. जर्मन तंत्रज्ञान वापरून पहिल्यांदाच हा रस्ता करण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात निकृष्ट दर्जामुळे हा रस्ता सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. रस्त्यासाठी भरीव निधी मंजूर झाल्याने हा रस्ता जर्मन तंत्रज्ञान वापरून बनविण्यास सुरुवातही झाली.
पहिल्या टप्प्यात या रस्त्यावर खडी टाकून त्याची दबाई करण्यात आली. त्यानंतर दोन महिने काम बंद राहिले. तेव्हापासून या रस्त्याकडे गुत्तेदार फिरकलाच नसल्याचे सांगण्यात येत आहे. वेळेत डांबरीकरण न झाल्याने रस्त्यावर टाकलेली खडी निखळून बाहेर पडली होती. नागरिकांची ओरड होताच थातूरमातूर पद्धतीने हा रस्ता तयार करण्यात आला असल्याचा आरोप आहे. येथील गावकऱ्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून रस्त्याच्या बोगस कारभाराची पोलखोल केली. रस्ता हाताने बाजूला करतांना सोशल मीडियावरील चित्रफितीत दिसून आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरात पोहोचलेल्या रस्त्याची चर्चा आता थेट केंद्र सरकारपर्यंत पोहोचली. यानंतर तडकाफडकी तीन सदस्यांचे पथक येथे दाखल झाले.
डांबराची तपासणी
रस्त्याच्या बोगसगिरीचा व्हिडीओ दिल्लीपर्यंत पोहोचल्यानंतर आता येथून सूत्रे हलविण्यात येत आहेत. शनिवारी केंद्रीय पथकाकडून रस्त्याच्या कामाची तपासणी करण्यात आली. हे पथक खास रस्त्याची तपासणी करण्यासाठी येथे आले होते. पथकाकडून रस्त्यावर टाकण्यात आलेले डांबर, खडी यांची तपासणी करण्यात आली. तपासणी अहवाल दोन-तीन दिवसांत सादर करणार असल्याची माहिती आहे. पथकात योजनेचे डेप्युटी डायरेक्टर राकेश कुमार, यू. जी. साहू, विष्णू राय यांचा समावेश होता.
गुन्हे दाखल करणार
केंद्र सरकारच्या पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून हा रस्ता तयार करण्यात येत आहे. मात्र, सुमार दर्जाच्या रस्त्याची लक्तरे वेशीवर टांगल्यानंतर आता प्रशासनाला जाग आली आहे. तपासणी पथकाच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या मुख्य अभियंत्या सविता शालगर यांनी दिला आहे. यावेळी कैलास वाघ, भरत घुले, परमेश्वर आव्हाड, ज्ञानेश्वर घुगे, तुकाराम चेपटे उपस्थित होते.