ग्रामपंचायत निवडणुकीत जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींचा लागणार कस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:24 AM2020-12-25T04:24:49+5:302020-12-25T04:24:49+5:30
जालना जिल्ह्यात ७७९ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ४७५ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात संपली आहे. कोरोनामुळे शासनाने ग्रामपंचायतींवर प्रशासकाची ...
जालना जिल्ह्यात ७७९ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ४७५ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात संपली आहे. कोरोनामुळे शासनाने ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. जालना जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता आहे. बहुतांश ग्रामपंचायती या महाविकास आघाडीच्या ताब्यात आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायती पुन्हा आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते कामाला लागले आहेत. दुसरीकडे भाजपचे सदस्यही मैदानात उतरले असून, आपल्या गटातील ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अध्यक्षांसह उपाध्यक्ष, सभापती व सदस्य ठिकठिकाणी बैठका घेऊन आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक यंदा चुरशीची होणार असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षांचा वरूड बु. गट
या गटाचे सदस्य उत्तम वानखेडे हे ७७४ मताधिक्क्याने निवडून आले होते. ते सध्या जि.प. अध्यक्ष असून, या गटातील भारज बु, वरूड, सावरखेडा गोंधन, भरडाखेडा-सोनखेडा या ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. या ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यासाठी तसेच समर्थकांना निवडून आणण्यासाठी त्यांचा कस लागणार आहे. यामध्ये कोण बाजी मारते? याकडे लक्ष लागून आहे.
जिल्हा परिषद उपाध्यक्षांचा तीर्थपुरी गट
या गटाचे सदस्य महेंद्र पवार यांनी ३५०० मताधिक्क्याने विजय मिळविला होता. ते सध्या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असून, त्यांच्या गटातील तीर्थपुरीसह ५ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. उड्डाण कंडारी ग्रामपंचायत ही विरोधी गटाच्या ताब्यात होती. ही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
कृषी सभापतींचा धाकलगाव गट
या गटाच्या सदस्या प्रभा गायकवाड यांनी १७०० मताने विजय मिळविला होता. त्या सध्या कृषी सभापती असून, या गटातील शहापूर, बारासोडा या ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. या ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी त्यांना राजकीय व्यूहरचना आखावी लागणार आहे.
शिक्षण सभापतींचा गुरूपिंपरी जि. प. गट
या गटाच्या सदस्या पुजा सपाटे यांनी २६०० मते जास्त घेत प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात केली होती. त्या सध्या आरोग्य व शिक्षण सभापती असून, या गटातील माहेरजवळा व देवडे हादगाव आदी ग्रा.पं.तीची निवडणूक होत आहे. माहेरजवळा ग्रामपंचायत ही प्रतिष्ठेची समजली जाते. ही ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे.
बालकल्याण सभापतींचा रोशनगाव गट
या गटाच्या सदस्या अयोध्या चव्हाण यांनी ११०० मताधिक्क्याने विजय मिळविला होता. त्या सध्या महिला व बालकल्याण सभापती असून, या गटातील देवगाव, कस्तुरवाडी, धोपटेश्वर, अंबडगाव ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. अधिकाधिक ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यासाठी चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली.