धक्कादायक ! मतदान प्रक्रिया सुरु होताच उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 07:09 PM2021-01-15T19:09:08+5:302021-01-15T19:14:37+5:30
gram panchayat candidate dies प्रभाकर शेजूळ यांचे अकाली निधन झाल्याने शोकाकूल वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली.
राजूर (जि. जालना) : मतदानाच्या दिवशीच ग्रामपंचायतीच्या उमेदवाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. १५) सकाळी भोकरदन तालुक्यातील कोठा दाभाडी येथे घडली. प्रभाकर दादाराव शेजूळ (५०) असे मृत उमेदवाराचे नाव आहे.
कोठा दाभाडी येथील ग्रामपंचायत निवडणूक शुक्रवारी पार पडली. सहा जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात होते. प्रभाकर शेजूळही निवडणुकीच्या रिंगणात होते. शेजूळ यांनी शुक्रवारी सकाळी लवकर उठून आंघोळ केली. मारुतीचे दर्शन घेऊन निवडणुकीत विजयासाठी साकडे घातले. त्यानंतर मतदारांच्या भेटीगाठी घेत असताना अचानक त्यांच्या छातीत कळा सुरू झाल्या. त्यांना तत्काळ जालना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
कोठा दाभाडी हे छोटेसे गाव असून, येथे ५८२ मतदार आहेत. येथे सात सदस्य संख्या आहे. एक जागा बिनविरोध निघाल्याने सहा जागांसाठी बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. प्रभाकर शेजूळ यांचे अकाली निधन झाल्याने शोकाकूल वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुली असा परिवार आहे.