लाच घेणारी ग्रामसेविका सापळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:13 AM2018-01-12T00:13:31+5:302018-01-12T00:13:34+5:30
जालना तालुक्यातल्या हिवरा रोषणगाव येथील ग्रामसेविका सारिका उत्तमराव तायडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी तीन हजारांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले.
जालना : जालना तालुक्यातल्या हिवरा रोषणगाव येथील ग्रामसेविका सारिका उत्तमराव तायडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी तीन हजारांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. फायनान्स कंपनीकडून गृह कर्ज घेण्यासाठी गावातल्या घराच्या नमुना क्रमांक आठवर कर्ज बोजा नोंद करून देण्यासाठी ग्रामसेविकेने तक्रारदाराकडे लाच मागितली होती.
या प्रकरणातील तक्रारदाराने गावात फायनान्स कंपनीच्या अर्थसाहाय्याने घर बांधले होते. त्यासाठी फायनान्स कंपनीला आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. फायनान्स कंपनीने हिवरा रोषणगावच्या ग्रामसेविका सारिका तायडे यांच्या नावे पत्र देऊन तक्रारदारास नमुना क्रमांक आठवर कर्जाचा एक लाखाचा बोजा टाकू न आणण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदारास कर्ज रक्कम देण्यात येणार होती. ग्रामसेविकेने या कामासाठी तीन हजारांची लाच मागितली. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यानंतर गुरुवारी सकाळी ग्रामसेविका राहत असलेल्या सोनलनगर परिसरातील घरात सापळा लावून सारिका तायडे यांना तीन हजारांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले.
या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक आदिनाथ काशिद, विनोद चव्हाण, कर्मचारी अशोक टेहरे, संतोष धायडे, प्रदीप दौंडे, अमोल आगलावे, संजय उदगीरकर, रामचंद्र कुदर, गंभीर पाटील, महेंद्र सोनवणे, संदीप लव्हारे, ज्ञानेश्वर म्हस्के, प्रवीण खंदारे यांनी ही कारवाई केली.