व्यायामशाळांना अनुदानाची खैरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:23 AM2018-03-11T00:23:08+5:302018-03-11T00:23:43+5:30
चांगले खेळाडू घडावे, ग्रामीण भागातही युवकांना व्यायाम व खेळाच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी क्रीडा विभागाडून विविध योजना राबवल्या जातात. व्यायाम शाळा उभारणीसाठीही अनुदान दिले जाते. मात्र, कुठल्याही निकषांची तपासणी न करता जिल्ह्यातील व्यायाम शाळांना लाखो रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात चांगले खेळाडू घडावे, ग्रामीण भागातही युवकांना व्यायाम व खेळाच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी क्रीडा विभागाडून विविध योजना राबवल्या जातात. व्यायाम शाळा उभारणीसाठीही अनुदान दिले जाते. मात्र, कुठल्याही निकषांची तपासणी न करता जिल्ह्यातील व्यायाम शाळांना लाखो रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.
क्रीडा विभागातर्फे शहरी व ग्रामीण व्यायाम शाळा बांधकाम व साहित्य खरेदीसाठी अनुदान दिले जाते. यासाठी दरवर्षी १ कोटी रुपयांची तरतूद केली जाते. गतवर्षी जिल्ह्यातील सुमारे २५ व्यायाम शाळांना अनुदानाच्या पहिल्या हप्त्याचे वाटप करण्यात आले होते. हे अनुदान देण्यापूर्वी सदर व्यायाम शाळांनी बांधकामाचे फोटो, त्याचा प्रोग्रेस रिपोर्ट, अनुदान विनियोग प्रमाणपत्र, साहित्य खरेदी याची परिपूर्ण माहिती सादर केल्यानंतर दुसºया टप्प्याचे अनुदान दिले जाते. या वर्षी दुस-या टप्प्यात व्यायाम शाळांना लाखो रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. म्मात्र हे करताना आवश्यक निकषांनुसार व्यायाम शाळेचे काम झाले आहे का याची तपासणी क्रीडा विभागाने प्रत्यक्षात केलेली नसल्याच्या तक्रारी काही क्रीडा प्रेमी संघटनांनी केल्या आहेत. निकषात न बसणाºया व्यायाम शाळांनाही अनुदानाचे वाटप केल्याचे प्रकारही घडले आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील काहींना हाताशी धरून अनुदानाचे प्रस्ताव बनविणे, त्यांची शिफारस करणे आणि अनुदान देण्यासाठी ‘अर्थपूर्ण’ व्यवहाराचे प्रकार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकारामुळे अनेकदा प्रमाणिकपणे काम करणाºया संस्थांना अनुदानाचा लाभ मिळत नाही. जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांच्या क्रीडांगणासाठी अनुदान दिले जाते. यासाठी जवळपास एक कोटी रुपयांची तरतूद केली जाते. यावर्षीही क्रीडांगणाचे प्रस्ताव निकाली काढण्यात आले असून, त्यासाठी क्रीडा अधिका-यांनी त्या-त्या क्रीडांगनाची पाहणी केली आहे की नाही, ही बाब गुलदस्त्यातच आहे. यासंदर्भात जिल्हा क्रीडाधिकारी शरद कचरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.
जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला बळकटी देण्यासाठी क्रीडा संस्थांनी विविध कार्यक्रम घेवून क्रीडाक्षेत्राला पोषक वातावरण तयार करावे, युवकांचे प्रबोधन व्हावे यासाठी युवक कल्याण कार्यक्रम राबविला जातो. त्यासाठी संस्थांना २५ हजारांचे अनुदान दिले जाते. यावर्षी युवक कल्याण कार्यक्रमांतर्गत प्रस्ताव मागविण्यात आले होते. जिल्ह्यातून चारशेंवर संस्थांनी प्रस्ताव दाखल केलेले आहेत. मात्र या संस्थांचे प्रस्ताव अजुनही प्रलंबित आहेत. क्रीडांगण आणि व्यायाम शाळांचे प्रस्ताव निकाली निघल्यामुळे युवक कल्याणसाठी प्रस्ताव दाखल केलेल्या संस्थांच्या प्रस्तावाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.