कुशल मनुष्यबळास आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:24 AM2021-07-17T04:24:10+5:302021-07-17T04:24:10+5:30

जालना : सध्याच्या परिस्थितीत आरोग्य क्षेत्र हे सर्वात जास्त रोजगार देणारे क्षेत्र म्हणून सिद्ध झाले असून, कोरोना साथरोगाच्या ...

Great employment opportunities in the health sector for skilled manpower | कुशल मनुष्यबळास आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी

कुशल मनुष्यबळास आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी

Next

जालना : सध्याच्या परिस्थितीत आरोग्य क्षेत्र हे सर्वात जास्त रोजगार देणारे क्षेत्र म्हणून सिद्ध झाले असून, कोरोना साथरोगाच्या जास्त प्रादुर्भावादरम्यान प्रशिक्षित व कौशल्यधारक मनुष्यबळाचा राज्य व देशात मोठा तुटवडा जाणवला. यापुढे कौशल्यधारक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम योजना नुकतीच सुरू केली आहे. आरोग्य क्षेत्रात सेवा करण्याची मोठी संधी असून, कौशल्यधारक मनुष्यबळास आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. यामुळे आरोग्य क्षेत्रामधील विविध कौशल्याचे प्रशिक्षण घेण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी जागतिक युवा कौशल्य दिनाच्या कार्यक्रमात केले.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना व जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी डॉ. अर्चना भोसले, डॉ. आणेराव, डॉ. आशिष राठोड, डॉ. नितीन पवार, डॉ. संतोष जायभाये, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहायक जिल्हा समन्वयक जया नेमाणे आदींची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात उपस्थित प्रशिक्षणार्थींना प्रमुख अतिथींच्या हस्ते अप्रॉन, एन-९५ मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. त्यानंतर डॉ. अर्चना भोसले मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाने जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे युवक-युवतींना मोफत अल्पकालावधीचे १० विविध अभ्यासक्रमांचे कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध केले आहे. हे प्रशिक्षण घेऊन रोजगारक्षम होण्यासाठी गरजूंनी पुढे येण्याची गरज आहे. तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने १५ ते ३० जुलै या कालावधीत आयोजित केलेल्या ऑनलाइन रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमात डॉ. आशिष राठोड यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना कौशल्य आत्मसात करण्याचा सल्ला दिला. पुढे बोलताना ते म्हणाले, फ्लेबॉटोमिस्ट या अभ्यासक्रमाचे फक्त ज्ञान असून चालणार नाही, तर रक्त नमुना घेण्याचे कौशल्य असणे गरजेचे आहे. होम हेल्थ एड, जेरियाट्रिक केअर एड या दोन कोर्सेसची भविष्यात गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त संपत चाटे यांनी केले. आभार मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नितीन पवार यांनी मानले. सूत्रसंचालन सुशील उचले यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे चंद्रकांत मुंढे, मंगेश देशमुख, महेश उढाण आणि कौशल्य विकास कार्यालयाचे सुशील उचले, सुरेश बहुरे, अमोल बोरकर, रामदास फुले, सुभाष कदम, कैलास काळे, प्रदीप डोळे, उमेश कोल्हे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Great employment opportunities in the health sector for skilled manpower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.