भोकरदन येथे किराणा दुकानाच्या गोदामाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:58 AM2019-08-06T00:58:21+5:302019-08-06T00:58:37+5:30
किराणा दुकानाच्या गोदामाला सोमवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : एका किराणा दुकानाच्या गोदामाला सोमवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत गोदामातील अंदाजे ४५ लाख रूपयांचे किराणा साहित्य जळून खाक झाले. ही घटना भोकरदन शहरातील भोकरदन-जालना मार्गावरील आयेशा फंक्शन हॉलजवळ घडली.
भोकरदन-जालना मार्गावरील आयेशा फंक्शन हॉल शेजारी नाजेम खान नईम खान यांच्या मालकीच्या हिंदुस्थान ट्रेडर्स दुकानाचे गोदाम
आहे.
दुकानाचे मालक नाजेम खान हे रविवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास नेहमी प्रमाणे एजन्सी व गोदामची कामे उरकून कुलूप बंद करून घरी गेले होते. सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास या गोदामाला अचानक आग लागली. दुकान- गोदामातून आगीचे लोळ व धूर निघाल्याचे दिसताच परिसरातील लोकांनी नाजेम खान यांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे वाहन, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मुख्य फायरमन भूषण पळसपगार, वैभव पुणेकर, कैलास जाधव, सोमिनाथ बिरारे, रईस काद्री यांनी शर्थीचे प्रयत्न करून दोन बंब पाणी फवारून आग आटोक्यात आणली. आग नेमके कोणत्या कारणाने लागली, हे समजू शकले नाही. या आगीत विविध कंपन्यांची बिस्किटे, शाम्पू, साबण, जर्दा असा अंदाजे ४० ते ४५ लाख रुपायाचा माल जळून खाक झाला. भोकरदन सज्जाचे तलाठी बोडखे यांनी घटस्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला.