भूजल पातळीत ३ मीटरने घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:03 AM2019-04-08T00:03:26+5:302019-04-08T00:04:17+5:30
मागील पाच वर्षांच्या तुलनेत पाणीपातळी ३ मीटरपर्यंत घटली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात यंदा वार्षिक सरसरीच्या तुलनेत ५० टक्के पाऊस झाल्यामुळे दिवसेंदिवस पाणीपातळी कमालीची खालावत असून, मागील पाच वर्षांच्या तुलनेत पाणीपातळी ३ मीटरपर्यंत घटली आहे. पुढील दोन महिने तीव्र उन्हाचे जाणार असल्याने पाणीपातळी आणखी घटणार असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प कोरडेठाक पडलेले आहेत. परिणामी, सध्या टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहेत. जिल्ह्यात सध्या साडेतीनशे टँकरने पाणीपुरवठा होत असून ही संख्या येत्या काही दिवसांत वाढणार आहे. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या वतीने जलस्त्रोत असलेल्या ११० विहिरींची पाणीपातळी मोजण्यात आली. मागील पाच वर्षांतील मार्चमधील सरासरी पाणी पातळीच्या तुलनेत ३ टक्क्यींनी घट झाली आहे.
मार्चच्या सुरुवातीपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. वाढते तापमान पाहता उपलब्ध पाण्याचे बाष्पीभवन होत आहे.
एप्रिल मे आणि जूनमध्ये पावसाचे आगमन होईपर्यंत मोठ्या प्रमाणात टंचाई भेडसावणार आहे. अशा परिस्थितीत पावसाच्या पाण्याचा पूर्ण उपयोग करणे महत्त्वाचे आहे.
दरम्यान, जिल्हाभरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
जलबचतीसाठी सोशल मीडियाचा वापर
मार्चमध्ये करण्यात आलेल्या पाहणीत जिल्ह्यातील भूजल पातळी सरासरी ३ मीटरने खालावली आहे. पाण्याचे वाढते दुर्भिक्ष्य लक्षात घेता सामाजिक संघटना विविध उपक्रम राबवत आहेत. तर सोशल मीडियावरही थेंबथेंब वाचविण्यासाठी जलबचतीचा संदेश दिला जात आहे. पाण्याचे जतन करणे, योग्य वापर करणे, अनमोल ठेवा म्हणून पाणी हाताळणे यासाठी इतरांना प्रेरित करण्यासाठी जल अभियान देखील राबविण्यात येत आहे.
जाफराबाद तालुक्यात सर्वाधिक ४ मीटरने पाणी पातळी खालावली आहे. जाफराबाद, भोकरदन तालुक्यांकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे येथील जवळपास सर्वच प्रकल्प कोरडेठाक पडलेले आहेत. त्यामुळे भोकरदन व जाफराबाद तालुक्यांत सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येणाऱ्या काळात तीव्र पाणीटंचाई येथे भासणार आहे.