दहावीच्या नवीन अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना जीएसटीचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 01:01 AM2018-04-16T01:01:01+5:302018-04-16T01:01:01+5:30
नव्या अभ्यासक्रमात दहावीच्या गणिताच्या भाग- १ मध्ये जीसएसटी आणि शेअर्स संदर्भात धडे देण्यात आले आहेत. या माध्यमातून देशाच्या कर प्रणालीत जे नवीन बदल जीएसटीने आणले आहेत, तो जीएसटी म्हणजे काय, त्याची आकारणी, वसुली कशी केली जाते. याची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : इयत्ता दहावीचा अभ्यासक्रम यंदापासून बदलला आहे. बदलत्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञान व्हावे या हेतूने जीएसटी प्रमाणेच शेअर्स मार्केट म्हणजे काय बाबत सविस्तर माहिती गणिताच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. यापूर्वी इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांना प्राप्तीकराची आकारणी आणि त्याचे महत्व विशद करणारी माहिती देण्यात आली होती.
नव्या अभ्यासक्रमात दहावीच्या गणिताच्या भाग- १ मध्ये जीसएसटी आणि शेअर्स संदर्भात धडे देण्यात आले आहेत. या माध्यमातून देशाच्या कर प्रणालीत जे नवीन बदल जीएसटीने आणले आहेत, तो जीएसटी म्हणजे काय, त्याची आकारणी, वसुली कशी केली जाते. याची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. त्यात सीजीएसटी म्हणजेच केंद्रीय वस्तू सेवा कर आणि एसजीएसटी म्हणजेच राज्य वस्तू सेवा कर, असे भाग आहेत. त्या दोन्ही भागांमध्ये कर आकारणी व वसुली कशी होते हे अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
जीएसटी भरताना ज्या व्यावसासिकाची उलाढाल २० लाखांपेक्षा अधिक असेल त्यांना जीएसटीन क्रमांक घेणे बंधनकारक करण्यात आले असून, त्या सोबतच दहा आकडी पॅन नंबर बंधनकारक आहे. जीएसटीएन हा १५ आकड्यांचा क्रमांक असतो.
महाराष्ट्रासाठी जीसएसटीचा संकेत कोड हा २७ देण्यात आला आहे. तसेच जीएसटी आणि आयटीसी म्हणजे काय याची सविस्तर माहिती अभ्यासक्रमात दिली आहे.
एचएसएन हा संबंधित व्यापाऱ्यांची सविस्तर माहिती आणि कुठल्या मालाचा व्यवहार झाला आहे, याचा तपशील दर्शनवणारा कोड देण्यात आला असून, जीएसटी प्रणालीमुळे पूर्वीचे जे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर होते ते संपुष्टात आले आहेत. ते कोणते कर होते, या बद्दलही माहिती पुरवली आहे.
शेअर बाजाराचीही माहिती
जीसएटी प्रमाणेच शेअर्स बाजार संदर्भात देखील तपशीलवार माहिती देण्यात आली असून, त्यात म्युच्युअल फंड आणि इतर कोणकोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करता येते, तसेच तेथील गुंतवणूकीशी संबंधीत माहिती देण्यात आल्याने भविष्यात विद्यार्थ्यांना देशाचे व्यवहार कसे चालतात , करप्रणाली आणि गुंतवणुकीत सध्या काय सुरू आहे हे विद्यार्थ्यांना दहावीपासूनच माहिती होणार आहे.