गुन्हेगारीवर अंकुश घालण्याच्या पालकमंत्र्यांच्या पोलिसांना सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:38 AM2019-05-27T00:38:05+5:302019-05-27T00:39:12+5:30
पोलीस प्रशासनाने गुन्हेगारीस आळा घालावा, अशा सूचना पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी पोलीस अधिका-यांना दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गेल्या काही दिवसांपासून परतूर शहरात घरफोडी व चोऱ्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. घरफोडी, चोऱ्यांच्या तसेच इतर सामाजिक अपराधाच्या घटनेबाबत पोलीस प्रशासन गंभीर नसल्यामुळे या गुन्ह्यांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शहरात असुरक्षिततेचे वातावरण पसरले असल्याने पोलीस प्रशासनाने गुन्हेगारीस आळा घालावा, अशा सूचना पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी पोलीस अधिका-यांना दिल्या.
परतूर येथे रविवारी शहरासह तालुक्यातील विविध प्रकारच्या गुन्हेविषयक प्रकरणांचा त्यांनी आढावा घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भगवान मोरे, मोहन अग्रवाल व व्यापारी ओम मोर यांनी मनोगत व्यक्त करताना अलीकडच्या काळात शहरासह तालुक्यात वाढलेल्या अपराधाच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अपराधाच्या घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी अशी विनंती केली. पोलीस उपअधिक्षक बांगर व पोलीस प्रशासनातील इतर पोलीस अधिका-यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीमध्ये लोणीकर यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले. या बैठकीला राहुल लोणीकर, भगवान मोरे, मोहन अग्रवाल, बाबा तेलंगड, दयानंद काटे, संदीप बाहेकर, आरगडे, चव्हाण, ओम मोर, दिलीप होलानी यांची उपस्थिती होती.