पोलिसांच्या कारवाईत वाहनातून सव्वा लाखाचा गुटखा जप्त; चालक, क्लिनरने शेतात धूम ठोकली
By विजय मुंडे | Published: April 6, 2023 06:56 PM2023-04-06T18:56:19+5:302023-04-06T18:56:29+5:30
तिघांविरुद्ध मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जालना : मंठा पोलिसांनी एका वाहनावर कारवाई करून सव्वा लाखाचा गुटखा जप्त केला. ही कारवाई गुरुवारी पहाटेच्या सुमारास कर्नावळ पाटीजवळ करण्यात आली. पोलिसांचे पथक पाहताच चालकासह क्लिनरने शेतात धूम ठोकली. या कारवाईत गुटख्यासह एक वाहन, दोन मोबाईल असा एकूण ६ लाख ५५ हजार ९३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एका वाहनातून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक सुरू असल्याची माहिती पो.नि. संजय देशमुख यांना मिळाली होती. या माहितीवरून पो.नि. संजय देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास मंठा शहराजवळील कर्नावळ पाटीजवळ सापळा लावला. पोलिसांना पाहताच चालक, क्लिनरने वाहन सोडून शेतात पळ काढला. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता आतमध्ये एक लाख ३५ हजार ९३६ रुपयांचा गुटखा आढळून आला. गुटखासह पाच लाख रुपये किमतीचे वाहन, दोन मोबाइल असा एकूण ६ लाख ५५ हजार ९३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोनि. संजय देशमुख यांच्या फिर्यादीवरून संबंधित वाहनाच्या चालक, क्लिनरसह दीपक बोराडे अशा तिघांविरुद्ध मंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि. शिंदे हे करीत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संजय देशमुख, पो.उप नि. राऊत, पो.हे.कॉ. राठोड, पो.हे.कॉ. मेखले, गायके, मांगीलाल राठोड, दीपक आढे, प्रशांत काळे, विलास कातकडे, घोडके, संतोष बनकर, आनंद ढवळे, आमटे, चव्हाण, आसाराम मदने, पांडुरंग हागवणे, विजय जुंबड, हराळ, इलग यांच्या पथकाने केली.