गोंदी येथे अडीच लाखांचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:21 AM2021-06-26T04:21:45+5:302021-06-26T04:21:45+5:30
अंबड : तालुक्यातील गोंदी येथील सरकार किराणा दुकानात विक्रीसाठी ठेवलेला २ लाख ७४ हजार रुपयांचा गुटखा स्थानिक गुन्हे ...
अंबड : तालुक्यातील गोंदी येथील सरकार किराणा दुकानात विक्रीसाठी ठेवलेला २ लाख ७४ हजार रुपयांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जप्त केला.
गोंदी येथील सरकार किराणा दुकानात गुटख्याची अवैध विक्री सुरू असून, विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात गुटखा ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीवरून पथकाने गोंदी येथील हसनापूर रोडवरील सरकार किराणा दुकानावर छापा टाकून दुकानाची झाडाझडती घेतली असता, राज्यात बंदी असलेल्या गुटख्याचे बॉक्स पोलिसांना सापडले. यावेळी संशयित आरोपी आजिनाथ भाऊसाहेब मरकड (४५, रा. गोंदी, ता. अंबड) याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने घरातदेखील गुटखा असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा २ लाख ७४ हजार रुपयांचा साठा जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, पोनि. सुभाष भुजंग, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, पो.हे. कॉ. रणजित वैराळ, संजय मगरे, रामेश्वर बघाटे, देवीदास भोजने, महिला कॉन्स्टेबल समशेद पठाण यांनी केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत यांच्या तक्रारीवरून आजिनाथ मरकड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
फोटो
अंबड तालक्यातील गोंदी येथील किराणा दुकानातून जप्त केलेल्या गुटख्यासह पोलीस दिसत आहे.