व्यायाम शाळा खाजगी तत्त्वावर देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 01:19 AM2018-05-20T01:19:13+5:302018-05-20T01:19:13+5:30
क्रीडा संकुलाच्या दुरवस्थेबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित होताच क्रीडा विभाग खळबळून जागा झाला असून, येथील व्यायाम शाळा आता खाजगी तत्वावर चालविण्यासाठी देणार असल्याची माहिती सूत्रांंनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : क्रीडा संकुलाच्या दुरवस्थेबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित होताच क्रीडा विभाग खळबळून जागा झाला असून, येथील व्यायाम शाळा आता खाजगी तत्वावर चालविण्यासाठी देणार असल्याची माहिती सूत्रांंनी दिली.
‘प्रशासनाच्या अनास्थेमुळे क्रीडा संकुलाची दुरवस्था’ या मथळ्याखाली मंगळवारी लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत क्रीडा संकुलाची लवकरच दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती येथील सूत्रांनी दिली. या क्रीडा संकुलात बॅडमिंटन, अॅथेलेटिक्स, क्रिकेट आदी खेळांचे मैदाने आहे. येथे दररोज राष्ट्रीय, जिल्हास्तरीय खेळाडू खेळण्यासाठी येतात. परंतु मागील काही वर्षांपासून क्रीडा विभागाच्या दुर्लक्षामुळे क्रीडा संकुलाची दुरवस्था झाली आहे. येथील मुख्य मैदानाच्या सर्वच भिंतींना तडे गेले असून, दरवाजेही तुटले आहे. मैदानातील फुटबॉल खेळण्याच्या दांड्या वाकल्या असून, मैदानात सुविधांच्या अभाव आहे.
त्यामुळे खेळाडूंनी संकुलाकडे पाठ फिरवली आहे. त्याचबरोबर येथे खेळाडूंसाठी मोठी व्यायाम शाळा आहे. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील महागडे साहित्य धुळखात पडले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मागितला आहे. त्याचबरोबर ही व्यायाम शाळा लवकरच खाजगी तत्वावर चालविण्यासाठी देण्यात येणार असून क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी संगितले. दरम्यान, प्रशासन किती दिवसात हे काम करते याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.