गारपिटीमुळे ८८ हेक्टरवरील पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:58 AM2021-03-04T04:58:17+5:302021-03-04T04:58:17+5:30
भोकरदन : तालुक्यात गत महिन्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपीट झाली होती. या गारपिटीचा तालुक्यातील ८८ हेक्टरवरील पिकांना फटका ...
भोकरदन : तालुक्यात गत महिन्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपीट झाली होती. या गारपिटीचा तालुक्यातील ८८ हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, ६२८ शेतकऱ्यांच्या पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
भोकरदन तालुक्यातील मालखेडा, ठालेवाडी, इब्राहिमपूर, भोकरदन, नांजा, सुभानपूर आदी भागात १८ फेब्रुवारी रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीट झाली होती. यात फळबागा व हरभरा, मका, गहू, कांदा सीडस्चे अतोनात नुकसान झाले होते. शासनाकडून नुकसानीच्या पंचनाम्यांचे आदेश मिळाल्यानंतर महसूल, कृषी विभागाकडून संयुक्त पंचनामे करण्यात आले. या पंचनाम्यात तालुक्यातील ६२८ शेतकऱ्यांच्या ८८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आले. यात कांदा सीड्स पिकाचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. शिवाय वीज पडल्याने एकाचा मृत्यूही झाला होता. तहसील कार्यालयाकडून पाहणी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. तसेच ११ लाख ८८ हजार रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
कोट
भोकरदन तालुक्यातील ८८ हेक्टरवरील पिकांचे गारपिटीमुळे नुकसान झाले आहे. याचा फटका ६२८ शेतकऱ्यांना बसला आहे. झालेल्या नुकसानीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात आला असून, ११ लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.
संतोष गोरड, तहसीलदार, भोकरदन