मंठ्यात अतिक्रमणांवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:34 AM2019-03-14T00:34:46+5:302019-03-14T00:35:28+5:30
अंतर्गत रस्त्यावरील झालेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम नगरपंचायतने मंगळावारपासून हाती घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंठा : शहरातील अंतर्गत रस्त्यावरील झालेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम नगरपंचायतने मंगळावारपासून हाती घेतली आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यावरील अतिक्रमणावर हातोडा घातल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
मंठा शहराला अतिक्रमणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी नगरपंचायत सरसावली असून, अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वीही तीनवेळा अतिक्रमण हटविण्यात आले. या अतिक्रमणावर सातत्याने कारवाई न केल्यामुळे यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
शहराला अतिक्रमणाचा विळखा पडल्याने रस्ते दिवसेंदिवस अरुंद होत चालले होते. त्यामुळे रस्त्यावरून वावरताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहनधारकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. त्याचबरोबर शहराच्या सौंदर्याचे विद्रुपीकरण झाल्याने नगरपंचायतला नागरिकांनी वारंवार निवेदने दिली.
या निवेदनाची दखल घेत नगर पंचायतच्या वतीने १२ मार्चपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत शहरातील सर्वच अतिक्रमण हटवणार आहेत.