भोकरदन येथे नगरपरिषदेकडून अतिक्रमणावर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:32 AM2021-01-23T04:32:00+5:302021-01-23T04:32:00+5:30
भोकरदन : सिल्लोड रस्त्यावरील नगरपरिषदेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्ससमोर गाळेधारकांनी केलेले अतिक्रमण शुक्रवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले आहे. ...
भोकरदन : सिल्लोड रस्त्यावरील नगरपरिषदेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्ससमोर गाळेधारकांनी केलेले अतिक्रमण शुक्रवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले आहे.
नगरपरिषदच्या वतीने सिल्लोड रस्त्यावर २६ गाळ्यांचे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यात आले आहेत. कमी दराने हे गाळे भाड्याने देण्यात आले होते, परंतु काही गाळेधारकांनी अतिक्रमण केले होते, तर काहींनी रस्त्यावरच हातगाड्या व पान टपऱ्या उभ्या केल्या होत्या. यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा होत होता. शनिवारच्या आठवडी बाजारात तर तासनतास वाहतूककोंडी होत होती. काही संघटनांनी सदरील अतिक्रमण हटविण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन नगरपरिषदेने शुक्रवारी अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली. जेसीबीच्या साहाय्याने हे अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी पूजा दुधनाळे, कार्यालयीन अधीक्षक वामन आडे, नगर अभियंता कैलास ढेपले, कर निरीक्षक तायडे, गणेश बैरागी, बजरंग घुळेकर, ए.पी. इंगळे, अमित गुंटूक, मनीषा नरवडे, कैलास जाधव, सोमनाथ बिरारे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शहरातील इतर अतिक्रमणे कधी हटविणार?
सिल्लोड रोडवरील शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या समोरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. यामुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून, वाहनधारकांची गैरसोय थांबणार आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे, परंतु शहरातील इतर मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण कधी हटवणार? असा प्रश्न नागरिक करीत आहेत.