वरखेडा येथील ग्रामस्थांचा पंचायत समितीवर हंडा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 01:16 AM2019-05-03T01:16:10+5:302019-05-03T01:16:58+5:30
ठराविक गावकऱ्यांनाच पाणी सोडल्या जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयावर गुरूवारी सकाळी हंडा मोर्चा काढून गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : वरखेडा - विरो ता. जाफराबाद येथील ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होत असला तरी तो नियमित होत नाही. झाला तरी ठराविक गावकऱ्यांनाच पाणी सोडल्या जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयावर गुरूवारी सकाळी हंडा मोर्चा काढून गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून वरखेडा - विरो येथे सद्यस्थितीत एका टँकरने दररोज ३ फेरी प्रमाणे पाणीपुरवठा करावा अशी मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, टँकरची फेरी म्हणजेच १२ हजार लिटर पाणी देण्यात येते. गावातील जलकुंभाची क्षमता ६० हजार लिटर आहे. त्यामुळे किमान ३ दिवसाआड गावाला पाणी मिळाले पाहीजे. परंतु ११ एप्रिल पासून ग्रामस्थांना पाणी मिळाले नाही. याच मुद्यावरून ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत गटविकास अधिकारी उदयसिंह राजपूत यांना घेराव घालून पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
या निवेदनावर समाधान राऊत, भारत राऊत, रामेश्वर साबळे, सांडू, साबळे, भीमराव राऊत, विशाल पोघर, योगेश ऊबाळे, लहु राऊत, सुभाष साबळे, गजानन राऊत, सिद्धार्थ राऊत, शाम राऊत, शुभम ऊबाळे आदींच्या स्वाक्षºया आहेत.
सरपंच व ग्रामसेवक हे हेतूपुरत्सर पाणी सोडण्यास टाळाटाळ करतात. काही भागांत दोन दिवसाआड तर, काही भागात महिना - महिना पाणी मिळत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.