गाव कारभाऱ्यांचेच हात गैरव्यवहाराने बरबटलेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:42 AM2019-08-05T00:42:13+5:302019-08-05T00:43:21+5:30
चालू वर्षात एक-दोन नव्हे ३० सरपंचांना जिल्हा दंडाधिका-यांनी अपात्र ठरविले आहे.
दीपक ढोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गावाचा विकास करण्यासाठी ज्यांना सरपंच बनविले त्यांचेच हात भ्रष्टाचाराने बरबटत असल्याचे चित्र जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे दाखल होणा-या तक्रारींवरून दिसून येते. चालू वर्षात एक-दोन नव्हे ३० सरपंचांना जिल्हा दंडाधिका-यांनी अपात्र ठरविले आहे. यात शासकीय निधीतील अपहाराच्या तक्रारींचा भरणा असल्याचे दिसून येते.
ग्रामीण भागाचा विकास झाला तर देशाच्या विकासाला चालना मिळणार आहे. गावाचा कारभार हाकण्यासाठी सरपंचांची निवड केली जाते. शासन निर्णयानुसार आता जनतेतून सरपंच निवडले जात आहेत. सरपंच पदावर बसलेल्या व्यक्तीने विकास कामे करून ग्रामस्थांना मुलभूत सोयी-सुविधा देणे आवश्यक आहे. यात राज्य सरकारने १४ व्या वित्त आयोगांतर्गत सर्व निधी हा थेट ग्रामपंचायतीला वितरित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १४ वित्त आयोगाचा सर्वच निधी हा थेट ग्रामपंचायत कार्यालयाला जमा होतो. या निधीतून गावात विविध विकास करणे गरजे असते. मात्र, ‘खुर्ची’त बसलेल्या काही सरपंचांनी शासकीय नियमांनाच धाब्यावर बसवून कामकाज केल्याचे चित्र आहे. अशा सरपंचांचे पितळ उघडे पाडण्याचे काम विरोधी सदस्य करीत आहेत.
मागील वर्षभरात १४ व्या वित्त आयोगाच्या कामात मोठ्या प्रमाणात अपहार होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिका-यांकडे आल्या आहे. भ्रष्टाचारासह तिसरे अपात्य न दाखवणे, अवैध वाळू उपसा, अतिक्रमण, राजीनामा विहित मुदतीत न देणे यासह इतर तक्रारी जिल्हाधिका-यांकडे दाखल झाल्या होत्या. दाखल तक्रारीच्या सुनावणीनंतर समोर आलेले पुरावे ग्राह्य धरून जिल्हाधिका-यांनी आजवर ३० सरपंचांना अपात्र ठरवले आहे. दरम्यान, इतर काही ग्रामपंचायतीच्या तक्रारी प्रशासनाकडे दाखल झालेल्या आहेत.
जिल्हाधिका-यांकडे धडकल्या ४० तक्रारी
तिसरे आपत्य न दाखवणे, आर्थिक लाभ, अवैध वाळू उपसा, अतिक्रमण, राजीनामा विहित मुदतीत न देणे यासह इतर कारणावरुन जिल्हाधिका-यांकडे ४० तक्रारी आल्या होत्या. चौकशीनंतर ३० सरपंचांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
या गावच्या सरपंचांवर झाली कारवाई
जानफेळ, आनंदवाडी, मांडवा, आंबा, भारज खुर्द, लतीफपूर, कंडारी खु. रोषनगाव, श्रीकृष्णनगर यासह इतर गावातील सरपंच व डोल्हारा या गावातील उपसरपंचावर कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर वरुड बु. सुखापुरी, भाटेपुरी, मोहपुरी येथील सदस्यांवर विविध कारणांसाठी कारवाई करण्यात आली आहे. कारवाईनंतर अनेकांनी पुढील न्यायालयीन लढाईही सुरू ठेवली असून, तेथील निकाल कोणाच्या बाजुने लागणार याबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चाही सुरू असतात.