आरोपीला फाशी द्या; पद्मशाली समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:59 IST2018-09-19T00:59:38+5:302018-09-19T00:59:38+5:30
नगर शहरात दहा वर्षीय निष्पाप मुलीवर अत्याचार करणा-या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी पद्माशाली समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

आरोपीला फाशी द्या; पद्मशाली समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नगर शहरात दहा वर्षीय निष्पाप मुलीवर अत्याचार करणा-या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी पद्माशाली समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी माजी आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
अंबड चौफुलीजवळील शासकीय विश्रामगृहापासून पद्मशाली समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी झालेल्या मोर्चेक-यांनी विशेषत: महिला व युवतींनी घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत आरोपीविरुध्द कडक कारवाई करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोचार्चे रुपांतर सभेत झाले. यावेळी मार्गदर्शन करताना गोरंट्याल म्हणाले की, नगर येथील घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक असून या प्रकरणात पीडितेवर शासकीय रुग्णालयाऐवजी उच्च दर्जाच्या खासगी रुग्णालयात उपचार करुन तो वैद्यकीय उपचाराचा खर्च शासनाने उचलावा तसेच पिडीत मुलीच्या कुटुंबियांना भरीव आर्थिक मदत करावी, प्रकरणातील नराधमाला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी या खटल्यात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करुन हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल यांनी घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी समाजबांधवांची उपस्थिती होती.