निकालाने शिंदे परिवारात दसरा, दिवाळीपेक्षाही आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 01:03 AM2019-03-07T01:03:58+5:302019-03-07T01:04:36+5:30
सोळा वर्षाच्या संघर्षानंतर न्याय मिळाला अखेर सत्याचाच जय झाला अशा शब्दांत दरोडा, बलात्कार व खून खटल्यातून निर्दोष सुटलेल्या आरोपींच्या कुटुंबियांनी दिली.
फकिरा देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : सोळा वर्षाच्या संघर्षानंतर न्याय मिळाला अखेर सत्याचाच जय झाला अशा शब्दांत दरोडा, बलात्कार व खून खटल्यातून निर्दोष सुटलेल्या आरोपींच्या कुटुंबियांनी दिली. आरोपातून निर्दोष मुक्त झाल्याने आमचा आनंद गगनात मावणार नसल्याची प्रतिक्रिया १६ वर्ष त्रास भोगलेल्या नातेवाईकांनी लोकमतशी बोलताना दिली.
नाशिंक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील बेलटगव्हाण शिवारात ५ जून २००३ रोजी सशस्त्र दरोडा, खून व बलात्काराच्या खटल्यात सहा जणांना फाशीची शिक्षा झाली होती. ती शिक्षा दहा वर्षापूर्वी रद्द करण्यात आली होती, तर न्यायालयाने ५ मार्च रोजी या सर्वाची या खटल्यातूनच निर्दोष मुक्तता केली आहे त्यामध्ये राजू अप्पा शिंदे, अंबादास लक्ष्मण शिंंदे, राजू म्हसू शिंदे, बापू अप्पा शिंदे अंकुश मारोती शिंदे सर्व राहणार भोकरदन या चौघांची न्यायालयाने मंगळवारी निर्दोष मुक्तता केली. तर पूर्वी अंकुश मारोती शिंदे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. न्यायालयाच्या या निर्णयामुळे कुटुंबियांनी बुधवारी अखेर न्याय मिळाल्याने आनंदोत्सव साजरा केला.
न्या़ एक़े़ सिक्री, न्या़एस़अब्दुल नझीर, न्या एम़आऱशहा यांच्या खंडपीठाने नऊ वर्षापूर्वी यांना फाशीची शिक्षा सुनावल्याची चूक मान्य करून चूक सुधारून या सहा जणांना निर्दोष मुक्त केले. त्यातही उच्च व सर्वोच्च न्यायालयातील अपील व त्या नंतर सर्वोच्च न्यायालयातील फेरविचार याचिका अपयशी ठरल्यानंतर सुध्दा स्वत: हून चूक सुधारून या सहा जणांना न्याय देण्याचे काम केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाची माहिती त्यांना मिळताच वस्तीवर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शेवटी सोळा वर्षानी का होईना; सत्याचा विजय झाला असल्याचे मत त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केले आहे.
आपले वडील घरी येणार असल्यामुळे मुला -मुलींचा आनंद गगनात मावत नसल्याचे दिसून आले. अंबादास शिंदे यांच्या घरामध्ये आई तुळसाबाई लक्ष्मण शिंंदे, पत्नी बहिणाबाई शिंदे, मुले रामदास शिंदे, संजू शिंदे, किशोर शिंंदे, तर राजू म्हसू शिंदे यांच्या घरामध्ये पत्नी राणी शिंदे, मुलगी कोमल शिंदे, सुशीला शिंदे, पुष्पा शिंदे, तर बापू अप्पा शिंदे ंयांच्या घरामध्ये पत्नी राधाबाई शिंदे, संतोष शिंदे, कृष्णा शिंंदे, व मुलगी पूजा शिंदे असा परिवार आहे.