‘तो’ खून पैशाच्या देवाण-घेवाणीतून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:14 AM2019-09-03T00:14:19+5:302019-09-03T00:14:58+5:30
परतूर येथील कुंदन खंडेलवाल या युवकाचा पैशाची देवाण-घेवाण व वैयक्तिक कारणातून खून झाल्याचे स्थानिक गुन्हे शाखा, परतूर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
जालना/ परतूर : परतूर येथील कुंदन खंडेलवाल या युवकाचा पैशाची देवाण-घेवाण व वैयक्तिक कारणातून खून झाल्याचे स्थानिक गुन्हे शाखा, परतूर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणात सोमवारी पहाटे तिघांना जेरबंद करण्यात आले आहे. तिन्ही आरोपी मयताचे मित्र होते, असे सांगण्यात आले.
राहूल रामजीवन खंडेलवाल उर्फ रोहित शर्मा, पृथ्वीराज देविदास अंभोरे, अनिल विठ्ठल सोनवणे (सर्व रा. परतूर) अशी आरोपींची नावे आहेत. परतूर येथील कुंदन खंडेलवाल या युवकाचा ३१ आॅगस्ट रोजी खून झाल्याचा प्रकार समोर आला होता. खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि राजेंद्रसिंह गौर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कुंदनचा मित्र राहूल रामजीवन खंडेलवाल उर्फ रोहित शर्मा याला सोमवारी पहाटे चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर कुुंदन व राहूल या दोघात पैशाच्या देवाण-घेवाणीवरून व वैयक्तिक कारणावरून वाद सुरू होता. यातून ३१ आॅगस्ट रोजी दुपारी राहूल, पृथ्वीराज अंभोरे, अनिल सोनवणे या तिघांनी कुंदनला जिल्हा परिषदेच्या मैदानावर बोलावून घेतले. तेथून ते चौघे दोन दुचाकीवरून सन्मित्र कॉलनीच्या मैदानावर गेले. तेथे गप्पा मारताना कुंदनच्या डोक्याला पिस्टल लावून गोळी झाडत खून केल्याची माहिती राहूल याने पोलिसांना दिली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने पृथ्वीराज अंभोरे, अनिल सोनवणे या दोघांनाही ताब्यात घेतले.
पिस्टलसह पावणेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून एक देशी बनावटीचे पिस्टल, दुचाकी, मयताच्या गळ्यातील सोन्याची साखळी, मयताच्या फोडलेल्या मोबाईलचे तुकडे असा ३ लाख ४५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.