गोरगरीब मुलींना पैशांचे आमिष दाखवून फसवायचे, बनावट लग्न लावून नवरदेवाला लाखो रुपयांना लुटायचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:31 AM2021-01-20T04:31:17+5:302021-01-20T04:31:17+5:30
जालना : गोरगरीब मुलींना पैशांचे आमिष दाखवून फसवायचे, नंतर बनावट लग्न लावून नवरदेवाला लाखो रुपयांना लुटणाऱ्या टोळीप्रमुख महिलेसह बनावट ...
जालना : गोरगरीब मुलींना पैशांचे आमिष दाखवून फसवायचे, नंतर बनावट लग्न लावून नवरदेवाला लाखो रुपयांना लुटणाऱ्या टोळीप्रमुख महिलेसह बनावट नवऱ्यांना चंदनझिरा पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१५ दिवसांपूर्वीच गुजरात येथील तीन मुलांसोबत मुलींनी लग्न केले होते. बनावट बॉण्ड तयार करून हे लग्न लावण्यात आले होते. लग्नानंतर तीन वर, तीन वधू व राहुल म्हस्के हे एका गाडीने गुजरातकडे निघाले होते. जालना शहरातील नागेवाडी येथे आल्यावर मुलींनी लघुशंकेचे निमित्त करून गाडी थांबविली. त्यानंतर तीन मुलींसह राहुल म्हस्के हा पळून गेला होता. याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तीन नवऱ्या मुली, टोळीप्रमुख महिला व राहुल म्हस्के यास ताब्यात घेतले.
टोळीप्रमुखही जाफराबाद तालुक्यातील आहे. ती ठिकठिकाणी फिरून गोरगरीब मुलींचा शोध घेते. मुलींच्या घराच्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचा टोळीत समावेश करायची. मुलींची नावे बदलून त्यांना वेगवेगळ्या शहरात ठेवले जायचे. स्थळ आले की, त्याला होकार दिला जात होता. वेळोवेळी मुलींची नावे बदलून बनावट आधार कार्ड तयार केले जायचे. ठिकाण बदलून बनावट बॉण्ड तयार केल्यानंतर लग्न करून नवरदेवाकडून लाखो रुपये घेऊन पळून जायचे, या प्रकारे ही टोळी मुलांची फसवणूक करायची. बहुतांश तरुणांनी बदनामीच्या भीतीपोटी पोलिसांकडे तक्रारी केल्या नाहीत.
१५ जणांना फसवले
या टोळीने जवळपास १० ते १५ जणांना फसवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सदरील महिला नेहमीच आपले ठिकाण बदल होती. दरम्यान, बनावट बॉण्ड व आधार कार्ड तयार करणाऱ्याचा पोलीस तपास घेत आहे. या महिलेवर किती गुन्हे दाखल आहेत, याचाही शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. श्यामसुंदर कौठाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पोलीस कर्मचारी अनिल काळे, विजय साळवे व महिला नाईक रेखा वाघमारे यांनी केली.