..तर कार्यालय प्रमुख, कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:52 AM2019-07-23T00:52:35+5:302019-07-23T00:53:01+5:30
निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी सोमवारी अचानक शहरातील प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांना अचानक भेट दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी सोमवारी अचानक शहरातील प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांना अचानक भेट दिली. कार्यालयातील स्वच्छता, दस्तऐवज याची पाहणी करण्यात आली. कार्यालय व परिसरात अस्वच्छता आढळून आल्यास कार्यालय प्रमुखासह कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा वायाळ यांनी दिला.
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या सूचनेनुसार येथील प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या शासकीय कार्यालयांना निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी सोमवारी अचानक भेट दिली. प्रशासकीय इमारतींच्या कार्यालयामध्ये दस्तऐवज व्यवस्थित ठेवले आहेत की नाही, स्वच्छता आहे की नाही, तसेच कार्यालयामध्ये अधिकारी, कर्मचा-यांची उपस्थिती आहे का नाही, याची पाहणी केली. कार्यालयीन दस्तऐवज शासकीय नियमावलीप्रमाणे व्यवस्थित ठेवावेत, कुठल्याही प्रसंगी जुन्या कागदपत्रांची आवश्यकता भासते, अशा वेळी ही कागदपत्रे व आवश्यक माहिती वेळेत मिळावीत, याची दक्षता सर्व अधिकारी, कर्मचा-यांनी घ्यावी, शासकीय कार्यालयात नियमित स्वच्छता राहील याची सर्वांनी काटेकोरपणे दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. कार्यालयीन स्वच्छता ठेवणा-या अधिकारी, कर्मचा-यांचा प्रशासनामार्फत गौरव करण्यात येईल. मात्र, अस्वच्छता आढळली तर कार्यालयप्रमुखासह कर्मचा-यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
वायाळ यांनी रोजगार हमी योजना, पुनर्वसन, भूसंपादन, निवडणूक विभाग, जिल्हा खनिकर्म, रेकॉर्ड रुम आदी विविध विभागांची पाहणी केली. यावेळी सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी संतोष बनकर, तहसीलदार पडघन, नायब तहसीलदार संदीप ढाकणे, मयुरा पेरे, योगिता खटावकर आदींची उपस्थिती होती.