‘त्या’ मुख्याध्यापकाचा माफीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:22 AM2019-07-15T00:22:08+5:302019-07-15T00:22:51+5:30
रेनकोट सोबत नसल्याने पावसात भिजू नये म्हणून अर्धा तास अगोदर शाळा सोडणे कोकरंबा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला चांगलेच अंगलट आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळणी : रेनकोट सोबत नसल्याने पावसात भिजू नये म्हणून अर्धा तास अगोदर शाळा सोडणे कोकरंबा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला चांगलेच अंगलट आले आहे. ग्रामस्थांनी शनिवारी मुख्याध्यापकांना धारेवर धरत प्रश्नांचा भडीमार केला. त्यावेळी मुख्याध्यापकाने माफीनामा देत विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविण्याचे आश्वासन दिले.
मंठा तालुक्यातील कोकरंबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एन.व्ही.आघाव यांनी गुरूवारी दुपारी आभाळ भरून आल्यानंतर रेनकोट घरी विसरला, आपण भिजू नये म्हणून अर्धा तास अगोदर शाळा सोडून दिली होती. या प्रकाराने संतप्त झालेल्या पालकांनी शनिवारी सकाळी शाळेत गर्दी केली.
यावेळी मुख्याध्यापक आघाव यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करीत त्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यावेळी आघाव यांनी घडल्या प्रकाराबाबत माफी मागत महिनाभरात वर्गनिहाय विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सरपंच प्रबता सदावर्ते, केंद्रप्रमुख एस.यू.वाघ यांच्यासह पालक, ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.