आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 10:48 PM2020-03-23T22:48:38+5:302020-03-23T22:49:03+5:30

प्रत्येक घरात आरोग्य विभागाची टीम पोहोचत असल्याने तालुक्याच्या आरोग्याची सद्यस्थिती त्यातून समोर येऊन तातडीने आवश्यक उपाययोजना करणे सोपे होणार आहे.

Health Department staff house to house | आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी

आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्या- मुंबईतील चाकरमान्यांचा गावाकडे लोंढा सुरू आहे. त्यामुळे अंबड तालुक्यात आरोग्य विभागाने ‘डोअर टू डोअर’ माहिती संकलित करण्यास सुरूवात केली आहे. प्रत्येक घरात आरोग्य विभागाची टीम पोहोचत असल्याने तालुक्याच्या आरोग्याची सद्यस्थिती त्यातून समोर येऊन तातडीने आवश्यक उपाययोजना करणे सोपे होणार आहे.
अंबड तालुक्यात २ लाख २४ हजार १५६ लोकसंख्या असून, सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यात वडीगोद्री, सुखापुरी, जामखेड, धनगर पिंपरी, गोंदी, शहागड यांचा समावेश आहे. तसेच एकूण ३४ उपकेंद्रे आणि एक ग्रामीण रुग्णालयाद्वारे येथील जनतेला आरोग्य सेवा पुरवली जात आहे. तालुक्यात एकूण जवळपास ४१ जलद कृती दल पथके तयार करण्यात आली आहेत. या कामासाठी आशा कार्यकर्ती- २१३, आरोग्य कर्मचारी- १५० तसेच अंगणवाडी कार्यकर्ती- २७६, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील अशी आरोग्य विभागाकडून टीम तयार करण्यात आली आहे.
वडीगोद्री परिसरात आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन कोरोनाबाबत जागृती करत आहेत. परिसरातील रामगव्हाण, टाका, डोनगाव, दोदडगाव, शहापूर, धाकलगाव, पाथरवाला खुर्द, अंतरवाली सराटी, नालेवाडी, पिठोरी सिरसगाव आदी गावांना भेटी देऊन माहिती संकलित करीत आहेत.
पोटापाण्यासाठी मुंबई- पुण्यात तसेच इतर शहरात वास्तव्याला असणाऱ्यांची संख्या अंबड तालुक्यात खूपच मोठी असून, सध्या कोरोनाचा वाढता प्रभाव, बंद बाजारपेठा आणि शाळांना दिलेल्या सुट्ट्या यामुळे चाकरमान्यांनी घरचा रस्ता धरला आहे. पुण्या-मुंबईसह अन्य शहरात वास्तव्याला असलेल्यांची गावागावात गर्दी होत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. पोलीस पाटलांची यंत्रणा गावामध्ये बाहेरून येणाऱ्यांची माहिती संकलित करून पुढे पाठवीत आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन मुंबई- पुण्यासह परगावाहून कोणी आले का, असे असल्यास त्यांना ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास आहे का याबाबत माहिती गोळा करत आहे. प्रत्येक घरात आरोग्य विभागाची टीम पोहोचत असल्याने आणि त्यांच्याकडून पुन्हा- पुन्हा प्रत्येक कुटुंबाचा मागोवा घेण्याचेही नियोजन करीत असल्याने तालुक्याच्या आरोग्याची सद्यस्थिती त्यातून दररोज समोर येऊन तातडीने आवश्यक उपाययोजना करणे सोपे होणार आहे.

Web Title: Health Department staff house to house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.