लसीच्या तुटवड्यामुळे आरोग्य विभाग वैतागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:32 AM2021-04-28T04:32:42+5:302021-04-28T04:32:42+5:30
जालना जिल्ह्यात अन्य जिल्ह्यांप्रमाणेच १६ जानेवारीला लसीकरण सुरू झाले. आतापर्यंत जवळपास १ लाख ८८ हजार नागरिकांना लस देण्यात आल्याची ...
जालना जिल्ह्यात अन्य जिल्ह्यांप्रमाणेच १६ जानेवारीला लसीकरण सुरू झाले. आतापर्यंत जवळपास १ लाख ८८ हजार नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा समन्वयक डॉ. संतोष कडले यांनी दिली.
एकूणच ही लस दर आठवड्याला किमान ७० हजार नग या प्रमाणात उपलब्ध झाल्यासच उद्दिष्ट साध्य करता येणार आहे. जालन्यात दररोज दहा हजार जणांचे लसीकरणाचे ध्येय आहे; परंतु ही लस पाहिजे त्या प्रमाणात मिळत नसल्याने कुठेच शक्य होत नाही. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचे डोस घेतलेले अनेक आहेत. त्यामुळे आणखी संभ्रम वाढला आहे. कुठली तरी एकच लस जिल्ह्यात आली असती, तर बरे झाले असते, असेही सांगण्यात आले. दरम्यान, लस आल्यावर ज्यांचा पहिलाच डोस आहे, त्यांना प्राधान्य देणे अपेक्षित असताना दुसरा डोस घेणारेच जास्त गर्दी करत असल्याने आरोग्य विभागातील कर्मचारी हतबल झाले आहेत.
चौकट
नियोजन कोलमडले
जिल्ह्यात आणि शहरात जवळपास १०२ लसीकरण केंद्रे सुरू केली होती. थोड्या- थोड्या करून जवळपास सर्व केंद्रांवर लसीकरण सुरू राहील, याची काळजी घेतली गेली; परंतु लस अत्यल्प मिळत असल्याने हे नियोजन कोलमडले आहे. लसीची मागणी नोंदवली आहे; परंतु ती जोपर्यंत मुबलक प्रमणावर मिळत नाही, तोपर्यंत आम्हाला आणि अर्थात नागरिकांना दिलासा मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत चार लाख जणांचे लसीकरण होणे अपेक्षित होते.