कर्मचा-यांअभावी आरोग्यसेवाच आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:35 AM2018-01-31T00:35:58+5:302018-01-31T00:36:02+5:30
जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांतील अधिकारी आणि कर्मचा-यांच्या रिक्त जागांमुळे कारभार संथगतीने सुरू आहे. मूलभूत आणि जीवनावश्यक सुविधांपैकी एक असलेल्या आरोग्य खात्यात तब्बल २५७ कर्मचा-यांची पदे रिक्त असल्याचे उघडकीस आले आहे.
बाबासाहेब म्हस्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांतील अधिकारी आणि कर्मचा-यांच्या रिक्त जागांमुळे कारभार संथगतीने सुरू आहे. मूलभूत आणि जीवनावश्यक सुविधांपैकी एक असलेल्या आरोग्य खात्यात तब्बल २५७ कर्मचा-यांची पदे रिक्त असल्याचे उघडकीस आले आहे. शासनाने थेट निवड पद्धतीने या जागा भरण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, जागा कधी भरल्या जातील, याची शाश्वती नसल्याने सध्या तरी अधिकारी आणि कर्मचा-यांअभावी आरोग्य विभागच सलाईनवर आहे.
जिल्ह्यातील आरोग्यविषयक सुविधेच्या कामाचा व्याप मोठा आहे. जिल्हा परिषद सर्कल, मोठी बाजार गावे मिळवून एकूण ४० आरोग्य केंद्रे, २१३ उपआरोग्य केंद्रे आहेत. या व्यतिरिक्त एक उपजिल्हा रुग्णालय, एक जिल्हा रुग्णालय, स्त्री व बाल रुग्णालय आणि तालुका पातळीवर आठ ग्रामीण रुग्णालये आहेत. ग्रामीण भागात गोरगरीब, गरजू रुग्णांना शासकीय आरोग्य सेवेचाच आधार आहे. असे असले तरी आवश्यक सुविधांचा अभाव व रिक्त पदांमुळे रुग्णांना खाजगी रुग्णालयात महागडे उपचार घ्यावे लागत आहेत. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी कर्मचारी राहत नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागल्याची उदाहरणे आहेत.
एखादी दुर्घटना घडल्यास शवविच्छेदनासाठी नातेवाईकांना दिवस-दिवस ताटकळत बसावे लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. शिवाय आरोग्य विभागाकडून राबविण्यात येणा-या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ रिक्त पदांमुळे गरजूंना मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. रिक्त पदे भरण्याबाबत आरोग्य विभागाकडून केवळ कागदी घोडे नाचविण्याचे प्रकार सुरू आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वच जबाबदार पदाधिका-यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा आरोग्य विभागात वर्ग एक व दोनची अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा लसीकरण अधिकारी,प्रशासन अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी ही महत्त्वाची पाच पदे रिक्त आहेत.