हृदयद्रावक! एक दिवसाच्या बाळाला काटेरी झुडपात टाकून माता गायब
By विजय मुंडे | Published: April 1, 2023 07:17 PM2023-04-01T19:17:10+5:302023-04-01T19:17:37+5:30
जखमी बाळावर महिला रुग्णालयात उपचार; अज्ञात व्यक्तीसह मातेचा शोध सुरू
अंबड : येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरातील काटेरी झुडपात एक दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक शनिवारी सकाळी आढळून आले. जखमी अवस्थेतील त्या बालकावर जालना येथील महिला रुग्णालयात उपचार केले जात आहेत. या प्रकरणात अज्ञाताविरुद्ध अंबड ठाण्यात नोंद करण्यात आली असून, मातेसह इतर व्यक्तींचा पोलिस शोध घेत आहेत.
अंबड शहरातील हॉटेलचालक मारोती देवराव शिंदे हे शनिवारी सकाळी अंबड उपजिल्हा रुग्णालयाच्या जवळ गेले होते. त्यावेळी काटेरी झुडपात दगडांच्या आतमध्ये एक नवजात पुरुष जातीचे अर्भक त्यांना दिसून आले. त्यांनी तात्काळ अंशिराम बापूराव लांडे, शहादेव शंकरराव कांबळे यांना सोबत घेऊन बालकाला उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथे चौकशी केल्यानंतर त्या बालकाची नोंद उपजिल्हा रुग्णालयात नसल्याचे समोर आले. त्यावेळी अधीक्षक डॉ. डी.एन. देगावकर, डॉ. मंगल पवार यांनी बालकावर प्रथमोपचार करून पोलिसांना माहिती दिली. प्रथमोपचारानंतर त्या बालकास बाल कल्याण समिती अध्यक्ष एकनाथ राऊत, बालकल्याण समिती सदस्य ॲड. कैलास जारे, योगिता मांटे, हेल्पलाईनचे केंद्र समन्वयक संतोष दाभाडे, स्वयंसेवक सचिन लांडगे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सुरेखा सातपुते व पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने बाळाला जालना येथील महिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अंबड ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अंबड पोलिसांनी त्या मातेसह अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू केल्याचे सांगितले.
नागरिकांनी माहिती द्यावी
जिल्ह्यात कोठे अर्भक, अनाथ बालक आढळले, तर नागरिकांनी तात्काळ जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन, बाल कल्याण समितीशी संपर्क साधावा. प्रशासनाकडून बालकाची जबाबदारी घेऊन त्याला शिशुगृहात दाखल केले जाते. पालकाचा शोध न लागल्यास कायदेशीररित्या दत्तक पालकाची प्रकिया केली जाते.
- एकनाथ राऊत, अध्यक्ष, बाल कल्याण समिती.