जालन्याचा पारा ४४ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:49 AM2019-04-29T00:49:35+5:302019-04-29T00:49:48+5:30
रविवारच्या सुटीत पारा ४४.१ अंशावर गेल्याने जालनेकर वैतागून गेले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्याचा पारा वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे अंगाची लाही - लाही होत आहे. रविवारच्या सुटीत पारा ४४.१ अंशावर गेल्याने जालनेकर वैतागून गेले होते. २० एप्रिलपासून तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. २६ रोजी ४३ अंशांवर तापमान होते. यात वाढ होऊन २८ एप्रिलला पारा थेट ४४ अंशांवर गेल्याने शहरात मोठ्या प्रमाणात उकाडा वाढला आहे.
सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसत असल्याने येथील नगरपालिका परिसरात भरणाऱ्या आठवडी बाजारात सुध्दा ग्राहकांची गर्दी कमी दिसून आली. काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. तापमानाचा पारही खाली आला होता. यामुळे होणा-या गरमीपासून नागरिकांनी दिलासा मिळाला होता. मात्र जसजसा मे महिना जवळ येत आहे. यामुळे पारा वाढण्यास सुरुवात झाली आहे. पारा ४४ अंशांवर गेल्याने या वर्षातील तापमानाने सर्वाधिक उच्चांक गाठला आहे. पुढील काही दिवसांत यात अधिक वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
जिल्ह्यात आधीच वृक्षांची कमतरता आहे. असे असताना सुध्दा जिल्ह्यात वृक्षतोडीचे प्रमाण वाढतच आहे. यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाला धोका निर्माण झाला वाढत्या वृक्षतोडीमुळे जिल्ह्यात पर्जन्यमान घटले असून गेल्या चार वर्षापासून दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. वृक्षतोडीचा परिणाम तापमानावर झाला आहे. यामुळे पहिल्यांदाच पारा ४४ अंशांवर गेला आहे.
याला जिल्ह्यात होत असलेली बेसुमार वृक्षतोड जबाबदार असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. उन्हाची तीव्रता इतकी आहे की, सकाळी १० वाजल्यापासून उन्हाचे चटके बसायला सुरुवात होते. सकाळी ११ वाजेनंतर घराबाहेर पडणे नकोसे वाटत आहे. सर्वत्र कडाक्याच्या उन्हामुळे जनजीवनावर परिणाम झाला असून, दुपारी रस्ते सामसूम होताहेत. दुपारी ४ वाजेपर्यंत शहरातील रहदारी कमी होत आहे.
दैनंदिन व्यवहारावरही याचा परिणाम झाला आहे.
मामाचौक, शिवाजी पुतळा, अंबड चौफुली, गांधी चमन, भोकरदन नाका इ. परिसरात नियमित दिसणारी गर्दी विरळ झाली होती. ग्राहक सायंकाळी साडेपाच नंतरच घराबाहेर पडत आहेत. तर सकाळी ११ च्या आतच दैनंदिन व्यवहार उरकून घेत आहेत.
सूर्यास्तानंतरही उष्णतेची लाट कायम असते. रात्री साडेसात ते आठ वाजेपर्यत वातावरणात गरम हवा राहत आहे. यामुळे नागरिक हैराण आहेत. वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेक जण थंड पेय पिण्यासाठी गर्दी करतात. तसेच पंखे, कूलर खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे.