दोन तास धो..धो..पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:51 AM2018-06-10T00:51:40+5:302018-06-10T00:51:40+5:30
जिल्ह्यातील बहुतांश भागात शनिवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील बहुतांश भागात शनिवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जालना शहरात सायंकाळी सहानंतर दोन तास मेघगर्जनेसह पाऊस झाला. त्यामुळे सर्व रस्ते जलमय झाले होते. जाफराबाद, परतूर, बदनापूर, अंबड तालुक्यातही मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. मृग नक्षत्रात पावसाने प्रथमच जोरदार हजेरी लावल्यामुळे बळिराजा सुखावला आहे.
जिल्ह्यात शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. वातावरणातही प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारी काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मृग नक्षत्र लागल्यापासून दोन दिवसांपासून हुलकावणी देणारा पाऊस आजही बरसणार की नाही, असे वाटत असतानाच जालना शहरात सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. तब्बल अडीच धो धो पाऊस बरसला. त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. मस्तगड परिसरात नाल्यांमधील पाणी रस्त्यावर आल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली. शिवाजी पुतळा, कादराबाद, मामा चौक परिसरातील रस्तेही जलमय झाले होते.
जालना तालुक्यातही पावसाने सर्वदूर हजेरी लावली. तालुक्यातील वंजारउमद्र, पीरपिंपळगाव, माळशेंद्रा, गोंदेगाव, माळेगाव, जामवाडी, गुंडेवाडी, घानेवाडी, पानशेंद्रा, इंदेवाडी, सिरसवाडी, कडवंची, नंदापूर, धारकल्याण, रामनगर, रेवगाव, गोलापांगरी शिवारात पावसाने दोन ते अडीच तास जोरदार हजेरी लावली. भोकरदन, केदारखेडा, पारध, टेंभूर्णी, नांदखेड, हसनाबाद परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. नांदखेड परिसरात हवेमुळे काही घरांवरील पत्रे उडून गेले. अंबड तालुक्यातही बहुतांश भागात सायंकाळी पावसाने हजेरी लावली. भोकरदन परिसरातीही रात्री नऊच्या सुमारास पावसाने हजेरी लावली.
दरम्यान, जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. आता खऱ्या अर्थाने शेतीच्या कामांना वेग येणार आहे. बहुतांश भागात शेतकºयांनी कपाशी लागवडीसाठी शेत तयार करून शेतात ठिबक सिंचन अंथरून ठेवले आहे. काही शेतकºयांनी बी-बियाणांची खरेदी पूर्ण केली आहे. त्यामुळे कपाशी लागवडीसह पेरणीच्या कामांना वेग येणार आहे.
गैरसोय : सहा तास वीजपुरवठा खंडित
जालन्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर काही मिनिटात वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळी सात ते १२ वाजेपर्यंत सहा तास वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. अगोदरच पाणी साचलेल्या रस्त्यावरून अंधारातून जाताना वाहनधारकांना कसरत करावी लागली. ग्रामीण भागातही बहुतांशी ठिकाणी वीज गेल्याने ग्रामस्थांना रात्र अंधारातच काढावी लागली.