जालन्यातील ११ महसूल मंडळात अतिवृष्टी; दुधना,केळना नदीला आला पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 10:33 AM2019-10-23T10:33:05+5:302019-10-23T10:35:29+5:30
२४ तासात तब्बल ४८.७५ मिमी पाऊस झाला आहे
जालना : परतीच्या पावसाने जालना जिल्ह्याला दिलासा दिला आहे. मागील रविवारी २४ तासात ४२ मिमी पाऊस झाला होता. बुधवारी सकाळी ८ वाजन्यापूर्वीच्या २४ तासात तब्बल ४८.७५ मिमी पाऊस झाला आहे. तर ११ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली.
जालना तालुक्यातील रामनगर महसूल मंडळात ८४ मिमी, विरेगाव ९४ मिमी, पचनवडगाव ६५ मिमी, वाग्रुळ जहागीर ११० मिमी, बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी ८० मिमी, भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार ९५ मिमी, राजूर ७९ मिमी, केदारखेडा ८१ मिमी, अनवा १३० मिमी, परतूर महसूल मंडळात ७८ मिमी तर वडीगोद्री महसूल मंडळात ९८ मिमी पाऊस झाला. परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.
दुधना नदी दुथडी
परतूर : परिसरात मंगळवारी रात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे दुधना नदीला पूर आला आहे. निम्न दुधना प्रकल्पात उणे १४ टक्के मृत पाणीसाठा आहे. परतीच्या पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होणार असून, अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे.
भोकरदन तालुक्यात परतीच्या पाऊसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे केळना, पूर्णा, जुई, धामना, रायघोळ नद्यांना पुर आले आहेत तर बेलोरा येथील पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधारा एका बाजुने वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे