जोरदार पावसाने दुबार पेरणीचे संकट टळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:19 AM2021-06-30T04:19:50+5:302021-06-30T04:19:50+5:30
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांवरील दुबार ...
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले असून, हजारो हेक्टरवरील पिकांना जीवदान मिळाले आहे.
यंदा हवामान खात्याने चांगला पावसाचा अंदाज वर्तविला असल्याने शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या समाधानकारक पावसावर पेरणीला सुरुवात केली. हा पाऊस पेरणी योग्य नसला तरी पाऊस पडेल ही अपेक्षा ठेवत पारध आणि परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी मका, कपाशी, सोयाबीन, उडीद, मूग, तूर आदी पिकांची लागवड केली; परंतु पेरणीनंतर काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली तर काही ठिकाणी पावसाचा थेंबही पडला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. पाण्याअभावी पिके धोक्यात आली होती. शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती. सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे बळीराजा सुखावला असून, हजारो हेक्टरवरील पिकांना जीवदान मिळाले आहे. शिवाय, रखडलेल्या पेरण्यांनाही सुरुवात झाली आहे.
पारधसह परिसरातील पारध खुर्द, पिंपळगाव रेणुकाई, पद्मावती, लेहा , शेलुद, रेलगाव, मोहळाई, कोसगाव, हिसोडा, कोठा कोळी आदी भागांत हा पाऊस पडला. त्यामुळे मंगळवारी शेतात वापसा नसल्याने शेतकऱ्यांनी दुपारनंतर शेतीकामाला सुरुवात केली होती.
बँकांचे उंबरठे झिजवून, उसनवारी करून एका पावसाच्या भरवशावर पेरणी केली. त्यानंतर पाऊस पडला नाही. त्यामुळे अस्वस्थ झालो होतो. मात्र, सोमवारी समाधानकारक पाऊस पडल्याने जिवात जीव आला.
पांडू लोखंडे, शेतकरी, पारध बु.
===Photopath===
290621\img-20210620-wa0079.jpg
===Caption===
पारध परिसरात सोमवारी झालेली जोरदार पावसामुळे मिरची पीक असे तारारले आहे