‘त्या’ हेलिकॉप्टर्सचे जालन्यात पुन्हा लँडिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 04:50 AM2017-08-09T04:50:53+5:302017-08-09T04:50:53+5:30
शहराबाहेरील पारडगाव रोडच्या बाजुला मोकळ्या शेतात सैन्यदलाची दोन हेलिकॉप्टर मंगळवारी अचानक उतरली. सोमवारी अंबड तालुक्यातही भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर उतरले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर (जि.जालना) : शहराबाहेरील पारडगाव रोडच्या बाजुला मोकळ्या शेतात सैन्यदलाची दोन हेलिकॉप्टर मंगळवारी अचानक उतरली. सोमवारी अंबड तालुक्यातही भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर उतरले होते. सलग दोन दिवस अशा घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
परतूर शहरानजीक सकाळी ९ वाजेच्या सुमारास मुंबईहून नांदेडच्या दिशेने जाणारे भारतीय सैन्याची ही दोन हेलिकॉप्टर अचानक उतरली. दहा मिनिटांनंतर ती पुन्हा आकाशात झेपावली.
अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव-नागझरी गावच्या सीमेवर सोमवारी सकाळी सैन्य दलाच्या एका हेलिकॉप्टरने इमर्जन्सी लँडिंग केले होते.
हेलिकॉप्टर उतरले, पाहणी करून निघून गेले. यासंदर्भात आम्हाला कार्यालयीन काही सूचना किंवा माहिती नव्हती.
- संतोष वाळके, उपविभागीय पोलीस अधिकारी
भारतीय सैन्य दलाचे हेलिकॉप्टर्स असल्याने याची माहिती स्थानिक जिल्हा प्रशासनास देण्यात आलेली नाही. हा सरावाचा भाग असू शकतो. इतर कुठलीही गंभीर बाब नाही. - शिवाजीराव जोंधळे, जिल्हाधिकारी, जालना