जालन्यात १ सप्टेंबरपासून हेल्मेट सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 07:07 PM2018-08-25T19:07:16+5:302018-08-25T19:10:06+5:30

१ सप्टेंबरपासून याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार असून विना हेल्मेट वाहन चालविल्यास थेट पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

Helmet compulsion from September 1st in Jalna | जालन्यात १ सप्टेंबरपासून हेल्मेट सक्ती

जालन्यात १ सप्टेंबरपासून हेल्मेट सक्ती

Next

- दीपक ढोले 

जालना : अपघात टाळण्यासाठी जालना पोलिसांनी आता दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. १ सप्टेंबरपासून याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार असून विना हेल्मेट वाहन चालविल्यास थेट पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यापुढे हेल्मेट वापरणे तर बंधनकारक राहिलच शिवाय वाहतूक नियमांचे उल्लंघण करणेही वाहनधारकांना अंगलट येणार आहे. औरंगाबादनंतर जालन्यात ही मोहिम राबविण्यात येत आहे.

मद्यपान करून वाहने चालविणे, भरधाव वेग आदी कारणांमुळे अपघात वाढले आहेत. मागील तीन वर्षांत विविध अपघातांत ३२९ लोकांचा बळीही गेला आहे. या परिस्थितीस रस्ते जरी कारणीभूत असले तरी काही प्रमाणात वाहनधारकांचा निष्काळजीपणाही कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते. दुचाकी चालविताना हेल्मेट असणे बंधनकारक आहे. हेल्मेट नसेल वाहतूक नियमांचे उल्लंघण केले म्हणून पोलीस कारवाई करतात. यामध्ये न्यायालयात खटला किंवा दंड भरावा लागतो. पोलिसांकडून आतापर्यंत हेल्मेट नसणाऱ्या वाहनधारकांवर कारवाया केल्या जात नव्हत्या. परंतु नव्यानेच आलेले पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी नवीन मोहिम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

वाहतूक नियमांचे उल्लंघण करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाया करण्याच्या सुचना त्यांनी वाहतूक शाखेला दिल्या आहेत. तसेच १ सप्टेंबरपासून जिल्ह्यात सर्वत्र हेल्मेट सक्ती करा, ज्यांच्याकडे हेल्मेट नाही, त्यांच्यावर कारवाया करण्याचा आदेशही चैतन्य यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चतुर्भूज काकडे यांनी वाहन तपासणी मोहीम हाती घेतली आहे. हेल्मेटसाठी मात्र वाहनधारकांना आणि आठवड्याचा कालावधी दिला आहे. 

मार लागून मृत्यू
दुचाकी घसरून पडणे, समोरासमोर वाहनांची धडक होऊन खाली पडल्याने दुचाकीस्वारास डोक्याला मार लागतो. यामुळे रक्तस्त्राव होऊन वाहनधारकांचा जागीच मृत्यू होतो. डोक्याला मार लागल्यानेच सार्वाधिक मृत्यू होत असल्याचे सांगण्यात येते.

जनजागृती आवश्यक
औरंगाबादनंतर जालनामध्ये हेल्मेट सक्ती होत आहे. ही बाब सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगली आहे. परंतु याबाबत वाहनधारक जास्त जागरूक नाहीत. त्यांचे मनपरिवर्तन करून त्यांना वाहतूक नियमांच पालण करण्यासंदर्भात मार्गदर्शन करून आवाहन करण्याची गरज आहे. शिवाय याबाबत सार्वजनिक ठिकाण, शाळा, महाविद्यालयांमध्ये जावून जनजागृती करणे आवश्यक आहे.

कारवाईत दुजाभाव नको
अनेकवेळा कारवाई करताना वाहतूक पोलिसांकडून ओळखीच्यांना दंड न आकारता सोडून दिले जाते. सर्वसामान्यांना मात्र भिती दाखवून दंड वसूल केला जातो. त्यामुळे पोलिसांबद्दल संताप व्यक्त करण्यात येतो. हेल्मेट सक्ती १०० टक्के यशस्वी करायची असेल तर नागरिकांना समजून सांगण्याबरोबरच सर्वांवर समान कारवाई करणे गरजेचे आहे. यामध्ये दुजाभाव करू नये.

जनजागृती केली जात आहे
१ सप्टेंबरपासून जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. तत्पूर्वी मार्गदर्शन करण्याबरोबरच जनजागृती केली जात आहे. वाहनधारकांनीही अपघात टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर करावा. तसेच इतर वाहतूक नियमांचेही पालन करावे. सध्या विना परवाना, फॅन्सी नंबर प्लेट, अल्पवयीन वाहनचालक यांच्यावर वाहतूक शाखा कारवाया करीत आहे. यामध्ये सातत्य ठेवले जाईल.
- एस.चैतन्य, पोलीस अधीक्षक, जालना

Web Title: Helmet compulsion from September 1st in Jalna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.