तणनाशकांनी वाढविली शेतकऱ्यांची डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:31 AM2021-07-27T04:31:30+5:302021-07-27T04:31:30+5:30
जालना : जिल्ह्यातील फळबागांमधील तणाचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी सर्रास तणनाशकांचा वापर करतात. परंतु, सध्या तणांचा नायनाट करण्यासाठी हे तणनाशक ...
जालना : जिल्ह्यातील फळबागांमधील तणाचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी सर्रास तणनाशकांचा वापर करतात. परंतु, सध्या तणांचा नायनाट करण्यासाठी हे तणनाशक कुचकामी ठरत आहेत. त्यामुळे मोसंबी, द्राक्ष उत्पादक हैराण झाले असून, यात आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीत सुरू केला. त्याचाच एक भाग म्हणून तणाचा नायनाट करण्यासाठी तणनाशकांचा वापर वाढविला. परंतु, अलीकडील काळात तणनाशकाचा बंदोबस्त करणाऱ्या महागड्या कीटकनाशकांपासून काहीही फायदा होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. जालना तालुक्यामध्ये कडवंची, नंदापूर, धारकल्याण, पीरकल्याण, नाव्हा, वरुड, सिरसवाडी, घाणेवाडी, जामवाडी, कार्ला, हातवन, रामनगर परिसरात द्राक्ष, मोसंबी, डाळिंब, हळद उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. कडवंची येथील सोपान क्षीरसागर यांनी सांगितले की, पिकात तणाचा बंदोबस्त करायचा असेल तर तणनाशकाचा वापर केल्याशिवाय पर्याय नाही. द्राक्ष, मोसंबी उत्पादक कृष्णा क्षीरसागर यांनी सांगितले की, महिना-दीड महिन्यापासून द्राक्ष बागेमध्ये नामांकित कंपन्यांचे तणनाशकाचा वापरत आहे. दहा-पंधरा एकर द्राक्ष, सात ते आठ एकर मोसंबी तसेच सीताफळ फळबागा आहेत. वापर केलेल्या तणनाशकामुळे कुठेही तणाचा बंदोबस्त झाला नाही. विकत मिळणाऱ्या तणनाशकामध्ये काहीतरी दोष असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. त्यामुळे कृषी विभागाने फळ उत्पादक शेतकऱ्यांना नेहमी करिता लागणारे तणनाशक हे निकृष्ट दर्जाचे अथवा भेसळयुक्त बाजारात येत आहे का याची तपासणी करावी, अशी मागणी फळ उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे.
फोटो कॅप्शन : द्राक्ष उत्पादक कृष्णा क्षीरसागर यांनी द्राक्ष बागेत नामांकित कंपन्यांचे तणनाशक दोन वेळा फवारले तरीही गवत जशास तसे आहे.