अरे खोप्यामधी खोपा... सुगरणीचा चांगला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 01:01 AM2018-12-06T01:01:12+5:302018-12-06T01:01:35+5:30
अरे खोप्यामंधी खोपा जसा सुगरणीने इनला.. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी ज्या पक्षाचे वर्णन आपल्या कवितेत केले आहे. त्या सुगरणीच्या विणीचा हंगाम सध्या सर्वत्र बहरत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : अरे खोप्यामंधी खोपा जसा सुगरणीने इनला.. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी ज्या पक्षाचे वर्णन आपल्या कवितेत केले आहे. त्या सुगरणीच्या विणीचा हंगाम सध्या सर्वत्र बहरत आहे. पूर्वी सर्वत्र दिसणारे पक्षी आज दुष्काळामुळे दिसणे दुर्मिळ झाले आहे.
जीव झाडाला टांगून आपल्या कुटुंबासाठी हा पक्षी गवताची एक एक काडी इवलाशा चोचीत आणून मोठ्या कौशल्य व मेहनतीने घरटे विनतो. चिमणीच्या आकाराचा हा पक्षी राज्यभर ठराविक हंगामातच आढळतो. घरटी विणण्यासाठी गवताच्या काड्या गोळा करून विहिरीच्या कडेवर असलेल्या पिंपळ, बाभळी, बोर, काटेरी झुडूप; जे विहिरीपेक्षा उंच व विहिरीत झुकलेल्या झाडावर घरटी बनवण्यासाठी पहिली पसंती सुगरण पक्षी दाखवतो.
शेतीसाठी बागायती करण्यासाठी आज विहीर खोदण्याऐवजी शेतात घेतल्या जाणाऱ्या कूपनलिका, नदी पात्रातून केली जाणारी पाईपलाईन तर विहिरीचे पुनर्भरण, तसेच ठिक ठिकाणच्या झाडांची होत असलेली तोड, यामुळे सुगरणीच्या पारंपरिक वसाहती धोक्यात आल्या आहेत. या बदलांशी जुळवून घेत या पक्ष्याने इतरत्र पण अडचणीच्या ठिकाणी वसाहती बनवण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसते. बहिणाबाईंनी सुगरणीच्या घरालाच बंगल्याची उपमा दिली आहे. या पक्ष्याची सुरू असलेली लगबग ग्रामीण भागात क्वचितच नकळत पाहायला मिळत आहे.
या काळात या पक्ष्यांचा जीवनक्रम अनोखा असतो. प्रपंच सुरू करण्यापूर्वी घरटे बांधण्यास सुरुवात होते. घर बांधण्याचे काम फक्त नर करत असतो. तो अर्धवट अवस्थेतच घरट सोडून देतो. तर विणीच्या हंगामात नराला डोके व छातीवर पिवळा गर्द रंग येतो. त्यावेळी एका नराला अनेक सहचारिणी असतात. त्यामुळे तो वेगवेगळ्या गटांमध्ये त्याचा संसार फुलवत असतो.