परीक्षेला जाताना धडकली वडिलांच्या मृत्यूची वार्ता; काळजावर दगड ठेवून मुलीने दिला पेपर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 05:40 PM2023-02-23T17:40:55+5:302023-02-23T17:41:29+5:30
एकीकडे वडिलांचा मृत्यू अन् दुसरीकडे बारावीची परीक्षा; पेपर दिल्यानंतर मुलीने घेतले अंत्यदर्शन
- गणेश पंडित
केदारखेडा (जि.जालना) : बारावी बोर्ड परीक्षेचा पेपर देण्यासाठी निघालेल्या भोकरदन तालुक्यातील कोदुली येथील कोमलला आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याची वार्ता कानावर आली. आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. एकीकडे बारावीचा पेपर अन् दुसरीकडे आपला बापाच्या मरणाचे दु:ख. अशा स्थितीत कोमलने काळजावर दगड ठेवून गुरुवारी मराठीचा पेपर दिला. पेपर दिल्यानंतर तिने आपल्या वडिलांचे शेवटचे दर्शन घेतले. ही घटना परीक्षा केंद्रातील शिक्षकांना कळल्यावर तेदेखील भावुक झाले होते.
भोकरदन तालुक्यातील कोदुली कोमल शिंदे हिचे वडील संजय गंगाधर शिंदे हे ग्रामीण भागात भरणाऱ्या आठवडी बाजारात किराणा साहित्याची विक्री करतात. मंगळवारी आठवडी बाजार आटोपून ते बरंजळा-कोदुली मार्गावरून दुचाकीने आपल्या गावाकडे येत असताना त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले होते. आमदार संतोष दानवे, माजी. जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत साबळे, भगवान गिरणारे यांनी त्यांच्या उपचारासाठी प्रयत्न केले. परंतु, शेवटी प्रयत्न व्यर्थ ठरले आणि त्यांचा गुरुवारी मृत्यू झाला.
मयत संजय शिंदे यांची मुलगी कोमल सध्या बारावीची परीक्षा देत आहे. गुरुवारी तिचा मराठी विषयाचा पेपर होता. पेपर देण्यासाठी निघालेली असताना तिला वडिलांच्या निधनाची बातमी कळाली. शेवटी जडअंत:करणाने कोमलने बाभूळगाव येथील नागेश्वर बाबा उच्च विद्यालयात पेपर दिला. परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्राचे प्रा. विकास वाघ यांना ही बातमी कळाली. त्यांनी कोमलची भेट घेऊन तिला धीर दिला. पेपर देऊन घरी आल्यानंतर तिने आपल्या वडिलांचे शेवटचे दर्शन घेतले. यावेळी अंत्यदर्शनासाठी आलेल्या नातेवाइकांनी हे दृश्य पाहून हंबरडा फोडला होता.