उच्च रक्तदाब, मधुमेहाचा वाढतोय विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:31 AM2019-07-22T00:31:00+5:302019-07-22T00:31:45+5:30

पुरुषांच्या तुलनेत महिला वर्गाला बीपी, शुगरची अधिक लागण झाल्याचे अहवालातून समोर आले आहे.

High blood pressure, diabetes mellitus | उच्च रक्तदाब, मधुमेहाचा वाढतोय विळखा

उच्च रक्तदाब, मधुमेहाचा वाढतोय विळखा

googlenewsNext

विजय मुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : असंसर्गजन्य रोग प्रतिबंधक कार्यक्रमांतर्गत चालू वर्षात जिल्ह्यातील ३५ वर्षांवरील ८४५४७ महिला-पुरूषांची बीपी, शुगर तपासणी करण्यात आली. पुरुषांच्या तुलनेत महिला वर्गाला बीपी, शुगरची अधिक लागण झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. बीपीने ग्रासलेल्या ३५१७ तर शुगरचा आजार जडलेल्या ३३१५ महिला आढळून आल्या आहेत.
काळानुरूप बदललेली जीवनशैली, राहणीमान, खाण्या-पिण्यात झालेले बदल हे आज नानाविध आजारांना निमंत्रणच देत आहेत. अवेळी जेवण, अपुरी झोप, कामाचा ताण यासह इतर कारणांनी बीपी, (उच्च रक्तदाब), शुगर (मधुमेह) या आजाराने डोकं वर काढलं आहे. वयाची ३० ते ३५ वर्षे ओलांडलेल्या महिला, पुरूषांना या आजाराची लागण होत असल्याचे समोर आले आहे. या आजाराचा वाढलेला विळखा रोखण्यासाठी, आजाराची लक्षणे दिसताच नागरिकांनी उपचार सुरू करावेत, यासाठी शासनाने २०१५ पासून राज्यभरात असंसर्गजन्य रोग प्रतिबंधक कार्यक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. या कार्यक्रमांतर्गत गत दोन वर्षांपासून जालना जिल्ह्यात ३५ वर्षावरील महिला, पुरूषांची प्राथमिक आरोग्य केंद्र ते जिल्हा रूग्णालयापर्यंत तपासणी केली जात आहे. बाह्यरूग्ण विभागात किंवा अंतररूग्ण विभागात येणाऱ्या रूग्णांची, नागरिकांची तपासणी केली जात आहे.
या कार्यक्रमांतर्गत चालू वर्षात जिल्ह्यातील ८४ हजार १५ महिला, पुरूषांची तपासणी करण्यात आली. यात ६४५३ जणांना शुगरची (मधूमेह) लागण झाल्याचे समोर आले आहे. यात ३०७८ पुरूष तर ३३७५ महिला रूग्णांचा समावेश आहे. तर ६८२० जणांना बीपीची (उच्च रक्तदाब) लागण झाल्याचे समोर आले आहे. यात ३३०३ पुरूष तर ३५१७ महिला रूग्णांचा समावेश आहे. विशेषत: बीपी आणि शुगर हे दोन्ही आजार असलेले ११२३ रूग्ण आढळून आले आहेत. यात ५०७ पुरूष तर ६१६ महिला रूग्णांचा समावेश असल्याचे तपासणीत समोर आले आहे.
अशी घ्या दक्षता...
वजन नियंत्रित ठेवा, पुरेशी झोप घ्या, तणावमुक्त काम करा, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नका, मद्यसेवन करू नका, आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवा, कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवा, फास्टफूड खाणे टाळा, गोड पदार्थांचे सेवन कमी करा, नियमित व्यायाम करण्यासह वेळोवेळी आरोग्य तपासणी करून तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावेत.
रूग्णांचे नियमित औषधोपचार
असंसर्गजन्य रोग प्रतिबंधक कार्यक्रमांतर्गत बीपी, शुगरचा आजार आढळून येणाºया रूग्णांना मोफत औषधांचा पुरवठा केला जात आहे. यात शुगरचे ५४९० रूग्ण औषधोपचार घेत आहेत. यात २५५६ पुरूष तर २९३४ महिलांचा समावेश आहे. तर बीपीच्या गोळ्या ५७०७ रूग्ण घेत आहेत. यात २७६८ पुरूष तर २९३९ महिला रुग्णांचा समावेश आहे. तर दोन्ही आजारांची लागण असलेले ६४३ जण नियमित औषधोपचार घेत आहेत.

Web Title: High blood pressure, diabetes mellitus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.