महामार्गावर शाळकरी मुलांचा जीवघेणा खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:20 AM2019-07-09T00:20:37+5:302019-07-09T00:20:58+5:30
भिंतीची लांबी जमिनीपासून वरपर्यंत सात मीटर आहे. शाळकरी मुले या भिंतीवर चढून खाली माकडासारख्या उड्या मारतात. यामुळे अपघात होण्याची भीती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : शहागड (ता.अंबड) गावामधून येडशी-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग ५२ चौपदरीकरण व उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. तर पूल वगळता इतर भागांत सिमेंटचे गट्टू टाकून भरीव भिंत उभारण्यात आली आहे. त्या भिंतीची लांबी जमिनीपासून वरपर्यंत सात मीटर आहे. शाळकरी मुले या भिंतीवर चढून खाली माकडासारख्या उड्या मारतात. यामुळे अपघात होण्याची भीती आहे.
रस्त्याच्या उजवीकडील वाळकेश्वर, कुरण, नागझरी परिसरातील विद्यार्थी येथील जिल्हा परिषद हायस्कूल, प्रबोधनकार ठाकरे विद्यालयात शिक्षणासाठी येतात. दिवसांपासून विद्यार्थ्यांना जाण्यास रस्ता अथवा बोगदा तयार करण्यात आलेला आहे. मात्र, विद्यार्थी सात मीटर संरक्षण भिंतीच्या सिमेंटच्या गट्टूला पकडून 'स्पायडर मॅन' सारखी भिंतीवर चढून खाली उड्या मारतात. मात्र असे करताना विद्यार्थ्यांचा हात घसरून त्यांच्या जिवावर बेतू शकतो. मात्र याकडे कोणीच लक्ष देण्यास तयार नाही.
शाळा सुरु होऊन महिना व्हायला झाला तरी शाळा प्रशासन आणि संबंधित कंपनीचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
उड्डाणपूल परिसरात सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.