बदनापूर तालुक्यात सवार्धिक ८७.३१ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:26 AM2021-01-17T04:26:28+5:302021-01-17T04:26:28+5:30
ग्रामपंचायत निवडणूक; मतदानाचा टक्का वाढला जालना : जालना जिल्ह्यातील ४४६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी १,४७९ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. ...
ग्रामपंचायत निवडणूक; मतदानाचा टक्का वाढला
जालना : जालना जिल्ह्यातील ४४६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी १,४७९ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी उत्साहाने मतदान केले. सकाळपासूनच नागरिकांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. जिल्ह्यात ८२.३२ टक्के मतदान झाले. बदनापूर तालुक्यात सर्वाधिक ८७.३१ टक्के, तर सर्वांत कमी जालना तालुक्यात ७९.३५ टक्के मतदान झाले.
जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये संपली होती. ४७५ पैकी २६ ग्रामपंचायतींची बिनविरोध निवडणूक झाली, तर ४७८ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. ४४६ ग्रामपंचायतींच्या ३,६५३ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. १,४७९ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर मास्क व सॅनिटायझर ठेवण्यात आले होते. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पहिल्या दोन तासांत ९.४७ टक्के मतदान झाले. साडेअकरा वाजेपर्यंत २८ टक्के मतदान झाले होते. तर साडेतीन वाजेपर्यंत ६१.५८ टक्के मतदान झाले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ७ लाख २० हजार ०७५ मतदारांपैकी ५ लाख ९२ हजार ७८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ३ लाख १४ हजार ९०३ पुरुष तर २ लाख ७७ हजार ८८२ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात सर्वाधिक ८७.३१ टक्के मतदान झाले. तर जालना तालुक्यात सर्वांत कमी ७९.३५ टक्के मतदान झाले. त्यानंतर अंबड ८१.८८, घनसावंगी ८१.५६, परतूर ८४.०९, मंठा ८३.९५, भोकरदन ८२.०७, तर जाफराबाद तालुक्यात ८०.७२ टक्के मतदान झाले. ३,६५३ जागांसाठी १२३३२ उमेदवारांचे भवितव्य मतदारपेटीत बंद झाले आहे.
१८ जानेवारी रोजी फैसला
जालना जिल्ह्यातील ४४६ ग्रामपंचायतींच्या ३,६५३ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. १२३३२ उमेदवारांचा भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांचे लक्ष सोमवारी लागणाऱ्या निकालाकडे लागले आहे.
तालुकानिहाय झालेले मतदान
तालुका पुरुषमहिला
जालना ५२९२६ ४६७९२
बदनापूर ३६५१४ ३२०१६
अंबड ४७९३७ ४२५१६
घनसावंगी ३६६१९ ३२५७६
परतूर २२९८७ २०५४३
मंठा २९०८९ २५२३३
भोकरदन ७३०९९ ६४१७७
जाफराबाद १५७३२ १४०२९