उच्चशिक्षित युवकांनी शेतीला दिला उद्योगाचा दर्जा; रोपनिर्मितीतून साधली आर्थिक उन्नती!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 03:43 PM2023-03-02T15:43:12+5:302023-03-02T15:54:12+5:30

उच्चशिक्षित युवकांनी नोकरीच्या मागे न धावता शेतीत केले कष्ट

Highly educated youth gave agriculture the status of industry; Economic progress achieved through plant production! | उच्चशिक्षित युवकांनी शेतीला दिला उद्योगाचा दर्जा; रोपनिर्मितीतून साधली आर्थिक उन्नती!

उच्चशिक्षित युवकांनी शेतीला दिला उद्योगाचा दर्जा; रोपनिर्मितीतून साधली आर्थिक उन्नती!

googlenewsNext

- अझर शेख
वाटूर ( जालना) :
परतूर तालुक्यातील वाटूर येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील दोन भावांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेतले. परंतु, नोकरीच्या मागे न लागता घेतलेल्या शिक्षणाच्या बळावर वडिलोपार्जित शेतीत  फळे आणि भाजीपाल्याच्या दर्जेदार रोपांची निर्मिती करून त्यांनी स्वत:बरोबर शेकडो शेतकऱ्यांना समृद्ध  केले आहे.   मराठवाडा आणि विदर्भातील  दहा जिल्ह्यात त्यांची राेपे पोहचत आहेत. 

वाटूर येथील गजानन नरहरी माने या युवकाने खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रातून बीएसस्सी ॲग्रीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तर राजेश नरहरी माने यांनी डीटीएडचे शिक्षण घेतले आहे.  शेतीमधून उद्योग व रोजगार उभा करण्याच्या दृष्टीने दोघांनी आठ वर्षांपूर्वी वीस गुंठ्यांत रोपनिर्मिती सुरू केली. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्याबरोबरच कोरवाडवाहू जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही भाजीपाला पिकवता आला पाहिजे, हा त्यांच्या या रोपवाटिकेचा उद्देश होता. जिद्द, मेहनत आणि घेतलेल्या शिक्षणाचा दोघांना फायदा झाला. त्यांनी निर्माण केलेली विविध रोपे शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरली आणि येथूनच त्यांच्या रोपनिर्मिती उद्योगाला चालना मिळाली. रोपवाटिकामधून शेतकऱ्यांचा भरोसा माने बंधूंनी संपादन केला आहे. चांगल्या पद्धतीची रोपे चाळीस दिवसांत तयार करण्याचे तंत्र त्यांना अवगत झाले आहे. शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांबरोबर भाजीपाला निर्मितीतून उत्पन्नाचा स्त्रोत मिळावा, यासाठी माने बंधू विशेष करून भाजीपाल्यांच्या रोपांवर भर देत आहेत. सध्या दिवसाकाठी दहा ते पंधरा हजार रुपयांची रोपे तयार करून त्याची विक्री दोन्ही भावंडे करत आहेत. वर्षाकाठी  लाखो रूपयांची उलाढाल रोपवाटिकेतून होत असल्याचे त्यांनी सांगितले.

दहा जिल्ह्यात पोहचली वाटूरची ही रोपे 
माने बंधू बदलत्या काळानुरूप भाजीपाला आणि फळबागांच्या रोप निर्मितीवर भर देत आहे. त्यांच्या रोपवाटिकेत टोमॅटो, मिरची, कोबी, वांगे, सिमला मिरची, टरबूज, खरबूज, सीताफळ, जांभळ, शेवगा आदी भाजीपाला पिकांचे रोपे तयार होतात. सुरूवातीस अर्धा एकरात असलेली रोपवाटिका आता दोन एकरांत विस्तारली आहे. तसेच तयार केलेले रोपे आता घरपोच देण्याची सुविधा शेतकऱ्यांना माने बंधू देत आहेत. मराठवाडा आणि विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये त्यांची रोपे पोहचली आहेत.

विश्वास हीच आमची ओळख
कष्टाला जेव्हा विश्वासाची साथ मिळते तेव्हा उत्साह वाढतो. शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी निर्माण करता आली याचे समाधान आहे. आम्हाला या रोपांमुळे ओळख मिळाल्याचे माने बंधुनी सांगितले.

Web Title: Highly educated youth gave agriculture the status of industry; Economic progress achieved through plant production!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.