‘ति’च्या जन्मासाठी कन्यारत्न, माहेरभेट पुरस्कार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:36 AM2017-12-07T00:36:54+5:302017-12-07T00:37:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भोकरदन / जळगाव सपकाळ : मुलीच्या जन्माचे स्वागत करून जन्मदर वाढावा यासाठी तालुक्यातील हिसोडा ग्रामपंचायतीने स्तुत्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन / जळगाव सपकाळ : मुलीच्या जन्माचे स्वागत करून जन्मदर वाढावा यासाठी तालुक्यातील हिसोडा ग्रामपंचायतीने स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. मुलगी जन्माला आलेल्या कुटुंबांना कन्यारत्न व माहेरभेट असे पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मंगळवारी या पुरस्काराचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये गावातील कन्यारत्न पुरस्कारासाठी सात मुलींच्या नावे प्रत्येकी दोन हजार रुपये सुरक्षा ठेव रक्कम जमा करण्यात आली. तर माहेरभेट पुरस्कारासाठी एका महिलेला एक हजार रु पयांचे बक्षीस देण्यात आले.
हिसोडा येथील ग्रामपंचायतीने मुलींच्या जन्मदरात वाढ होण्यासाठी शासनाच्या नियमानुसार चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून कन्यारत्न व माहेरभेट असे दोन पुरस्कार देण्याचे उपक्रम ठरवला. योजनेत सहभाग घेण्यासाठी गावातून अर्ज मागविण्यात आले. त्यात गावातून कन्यारत्न पुरस्कारासाठी ७, तर माहेरभेट पुरस्कारासाठी १ अर्ज प्राप्त झाला होता. कन्यारत्नसाठी दोन हजार रु पये तर माहेरभेटसाठी एक हजार रु पये देण्यात आले. मुलीच्या नावाने प्रत्येकी दोन हजार रुपये दहा वर्षांच्या कालावधीसाठी फिक्स डिपॉझिट करण्यात आले आहे.
मुलीच्या घटत्या जन्मदरामागे आधुनिक तंत्रज्ञानाच्या गैरवापराबरोबर स्त्रियांना मिळणारी दुय्यम वागणूक हे कारणीभूत आहे. प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याने ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन कन्यारत्न व माहेरभेट पुरस्कार देण्याचा उपक्रम हाती घेतला असल्याचे ग्रा.पं. पदाधिका-यांनी सांगितले.