ऐतिहासिक... २८७ कोरोना योद्ध्यांकडे ‘लसीकरणास्त्र’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:27 AM2021-01-17T04:27:01+5:302021-01-17T04:27:01+5:30
विजय मुंडे जालना : ज्याच्यामुळे बाधितांचे नातेवाईक दुरावले... बाधितांच्या मृत्यूनंतर अप्तेष्टांना अंतिम दर्शन घेता आले नाही... ज्याच्यामुळे अनेकांच्या हातचे ...
विजय मुंडे
जालना : ज्याच्यामुळे बाधितांचे नातेवाईक दुरावले... बाधितांच्या मृत्यूनंतर अप्तेष्टांना अंतिम दर्शन घेता आले नाही... ज्याच्यामुळे अनेकांच्या हातचे काम गेले अन् लेकरांवर उपासमारीची वेळ आली... ज्याच्यामुळे युवकांना रोहयोच्या कामावर जाण्याची वेळ आली... आणि ज्याच्यामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत होऊन आर्थिक घडी विसकटली... त्या कोराेना विषाणूला मुळासकट संपविण्याच्या प्रयत्नातील लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यास शनिवारी उत्साहात प्रारंभ झाला. जिल्हा आरोग्य विभागातील २८७ जणांनी कोरोनाला संपविणारे लसरूपी ‘अस्त्र’ पहिल्या दिवशी घेत या ऐतिहासिक क्षणात सक्रिय सहभाग नोंदविला.
जालना जिल्ह्यात ६ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आणि सर्वसामान्यांची झोप उडाली. कोरोना विषाणूने आजवर जिल्ह्यात ३६० जणांचा बळी घेतला. आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या यशस्वी उपचारानंतर तब्बल १२ हजार ९०५ जणांनी कोरोनावर मात केली. कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे केवळ उद्योजक, व्यापारीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांचेही अर्थकारण बिघडले. त्यामुळे कोरोनावरील लस केव्हा येईल? याची आतुरता जिल्ह्यातील नागरिकांना होती.
अखेर बहुप्रतीक्षित कोरोनाची लस १४ जानेवारी रोजी जालना येथे दाखल झाली होती. १५ जानेवारी रोजी जिल्हा रुग्णालयासह परतूर, भोकरदन, अंबड येथील केंद्रावर ही लस पोहोचविण्यात आली. शनिवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केल्यानंतर जिल्ह्यातील चारही केंद्रांवर आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाचे लसीकरण करण्यात आले. जालना येथे परिचारिका रेखा वसू यांनी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्मजा सराफ यांना कोरोनाची लस दिली. दिवसभरात जिल्ह्यात २८७ जणांचे लसीकरण करण्यात आले. कोरोनामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर पाणावलेले डोळे आणि कोरोनामुक्त झालेल्या एखाद्याला निरोप देताना डोळ्यातून आनंदाश्रू निघालेल्या या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर लसीकरणानंतर एक उत्साह दिसून आला. विशेष म्हणजे लसीकरणानंतर सायंकाळी उशिरापर्यंत कोणालाही शारीरिक त्रास झाला नसल्याचे सांगण्यात आले. जालना येथील लसीकरणावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, कोविड रुग्णालयाचे प्रमुख डॉ. संजय जगताप यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
रुग्णालय इमारत सजली
कोरोनाच्या ऐतिहासिक लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आली होती. प्रवेशद्वारापासून लसीकरण कक्षापर्यंत ठिकठिकाणी केलेली सजावट येथे येणाऱ्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरली होती. लसीकरण झाल्यानंतर संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोणता त्रास होतो का, यासाठी त्यांच्यावर अर्धा तास विशेष लक्ष ठेवण्यात आले होते.
तालुकानिहाय झालेले लसीकरण
जालना- ६३
परतूर- ८२
भोकरदन- ६३
अंबड- ७९
एकूण- २८७
कोरोनाची स्थिती
जिल्ह्यातील संशयित- १९,६०२
चाचण्या- १,०५,४३८
बाधित- १३,४५२
मृत्यू- ३६०
कोरोनामुक्त- १२,९०५