जालन्यात संपातील कर्मचाऱ्यांकडून मेस्मांतर्गत दिलेल्या नोटिसांची होळी
By विजय मुंडे | Published: March 16, 2023 06:05 PM2023-03-16T18:05:45+5:302023-03-16T18:05:57+5:30
संपाच्या तिसऱ्या दिवशीही विविध शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता.
जालना : जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह इतर विविध मागण्यांसाठी सरकारी कर्मचारी संघटनांच्या वतीने संप पुकारण्यात आला आहे. या संपात सहभागी कर्मचाऱ्यांना मेस्मांतर्गत नोटिसा देण्यात आल्या आहेत. या नोटिसांची गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात होळी करण्यात आली. कर्मचारी संपावर असल्याने विभागप्रमुखही कार्यालयांतून गायब असल्याचे चित्र गुरुवारी दिसून आले.
सरकारी कर्मचारी संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या संपात जिल्ह्यातील विविध संघटना सहभागी झाल्या आहेत. या संपाचा आरोग्य, शिक्षण विभागासह इतर प्रशासकीय कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. रुग्णसेवा विस्कळीत झाली असून, शाळांमधील शिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचीही गैरसोय होत आहे.
संपाच्या तिसऱ्या दिवशीही विविध शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. अनेक कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीचे बोर्डच कक्षात लावून संपात सहभाग नोंदविला. हे बोर्ड पाहूनच जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना परतीचा मार्ग धरावा लागला. विशेषत: मेस्मांतर्गत दिलेल्या नोटिसांची, वरिष्ठांनी दिलेल्या नोटिसांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच होळी करून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रामदास शिराळे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे विभागीय उपाध्यक्ष प्रवीण पवार यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.