कोरोनावर मात करण्यासाठी घरपोच सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:25 IST2020-03-26T23:23:50+5:302020-03-26T23:25:04+5:30
अंबड (जि.जालना) नगर पालिकेने औषधे, किराणा, भाजीपाला आदी जीवनावश्यक साहित्य घरपोच करण्याचा निर्णय घेतला आहे

कोरोनावर मात करण्यासाठी घरपोच सेवा
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : जीवनावश्यक साहित्य खरेदीच्या नावाखाली नागरिक घराबाहेर पडत आहेत. नागरिकांनी घरातच रहावे, यासाठी आता अंबड (जि.जालना) नगर पालिकेने औषधे, किराणा, भाजीपाला आदी जीवनावश्यक साहित्य घरपोच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार व्यावसायिकांची यादी तयार करण्यात आली आहे. शिवाय कोरोनाबाबत घ्यावयाच्या दक्षतेचे स्टीकरही दारोदारी बसविण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याच्या नावाखाली अनेकजण रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे किराणा दुकान, भाजीपाला खरेदीसाठी गर्दी होत आहे. ही बाब पाहता सोशल डिस्टंसिंगसाठी अंबड नगर पालिकेचे मुख्याधिकारी सागर घोलप यांनी शहरातील औषध विक्रेते आणि किराणा व्यावसायिक संघटनेची बैठक घेऊन घरपोच सेवा करण्याची विनंती केली. त्यास संबंधित व्यवसायिकांनी प्रतिसाद दिला. तसेच कर्मचाऱ्यांमार्फत शहरातील भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेत्यांचे संपर्क क्रमांक घेण्यात आले आहेत. संबंधितांची यादी तयार करून अंबड शहरातील विविध व्हॉटस्अॅप ग्रुपद्वारे ती फिरविण्यात आली आहे. घरपोच सेवा देणाऱ्यांना पालिकेने ओळखपत्र तयार करून दिले आहेत.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरात एक रिक्षा लावून जागृती केली जात आहे. नागरिकांनी घ्यावयाची दक्षता, घरपोच साहित्य पुरवठा याची माहितीही नागरिकांना दिली जात आहे. एका ट्रॅक्टरच्या माध्यमातून शहरात निर्जंतुकीकरणाची फवारणी सुरू करण्यात आली आहे. यादी तयार करण्यासह शहर स्वच्छतेसाठी मुख्याधिकारी सागर घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली नगर पालिकेतील कपिल राहटगावकर, विलास खरात, आत्माराम भांगे, गौतम पारधे, गोपाळ चौधरी, भारत जाधव आदींनी प्रयत्न केले. नागरिकांनी घराबाहेर न पडता कोरोनाशी लढा द्यावा, यासाठी घरपोच साहित्य पुरविण्याचा उपक्रम अंबड पालिकेने हाती घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील इतर नगर पालिका, नगर पंचायतींसह ग्रामपंचायतींनी उपक्रम राबविला तर कोरोनाशी लढा देण्यास मोठी मदत होणार असून, पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणेवरील ताणही कमी होणार आहे. दरम्यान, शहरातील नागरिकांनीही अत्यावश्यक सेवांसाठी घराबाहेर न पडता घरपोच साहित्य मागवावे, विनाकारण घराबाहेर पडणा-यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.