प्रामाणिक प्रयत्नातून यश हमखास मिळते..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 12:51 AM2018-08-07T00:51:11+5:302018-08-07T00:52:12+5:30
आमच्या काळात अभ्यासासाठीची आजच्या एवढी साधने नव्हती. एकाच पुस्तकावर तीन ते चार विद्यार्थी अभ्यास करत असू, मात्र आमचे प्रयत्न प्रामाणिक होते आणि ध्येयही निश्चित असल्यानेच आपण येथेपर्यंत पोहोचल्याचे प्रतिपादन औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज मुत्याल यांनी सोमवारी येथे आयोजित सत्कार समारंभात केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आमच्या काळात अभ्यासासाठीची आजच्या एवढी साधने नव्हती. एकाच पुस्तकावर तीन ते चार विद्यार्थी अभ्यास करत असू, मात्र आमचे प्रयत्न प्रामाणिक होते आणि ध्येयही निश्चित असल्यानेच आपण येथेपर्यंत पोहोचल्याचे प्रतिपादन औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज मुत्याल यांनी सोमवारी येथे आयोजित सत्कार समारंभात केले.
जेइएस महाविद्यालयात मुत्याल यांचा जाहीर सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. यावेळी जेइएस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पुरूषोत्तम बगडिया, सचिव श्रीनिवास भक्कड, उपाध्यक्ष फुलचंद भक्कड, प्राचार्य जवाहर काबरा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांनी मुत्याल यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
मुत्याल यांनी त्यांचे महाविद्यालीयन शिक्षण याच जेइएस महाविद्यालयात घेतले. यावेळी मुत्याल यांनी त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला. भोकरदनचे माजी नगराध्यक्ष हर्षकुमार जाधव आणि अन्य मित्रांमध्ये एकच पुस्तक मिळायचे, त्या पुस्तक फाडून त्याची विभागणी करायची आणि नंतर ते पुन्हा बाइंडिंग करून जमा करायचो. असे ते म्हणाले. मोबाईलचा अतिवापर देखील करिअर चांगले करण्यात अडसर ठरत आहे. मोबाईल जरूर वापरा; परंतु त्याच्या आहारी जाऊ नका, असे मुत्याल म्हणाले. यावेळी हर्षकुमार जाधव यांनी देखील जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशवंत सोनुने यांनी केले. यावेळी विद्यार्थी तसेच प्राध्यापकांची मोठी उपस्थिती होती.