कृषी विज्ञान केंद्राचा सर्वोत्कृष्ट ‘निक्रा केव्हीके’ पुरस्काराने सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 12:31 AM2019-06-06T00:31:45+5:302019-06-06T00:32:50+5:30
जालना तालुक्यातील खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रास ‘सर्वोत्कृष्ट निक्रा केव्हीके-२०१९’ या पुरस्काराने मंगळवारी हैदराबाद येथे सन्मानित करण्यात आले.
लोकमत् ा न्यूज नेटवर्क
रामनगर : जालना तालुक्यातील खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रास ‘सर्वोत्कृष्ट निक्रा केव्हीके-२०१९’ या पुरस्काराने मंगळवारी हैदराबाद येथे सन्मानित करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहानिदेशक कृषी विस्तार डॉ. ए. के. सिंग यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सहाय्यक महानिदेशक नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन डॉ. एस. भास्कर, हैदराबाद केंद्रीय कोरडवाहू संशोधन संस्थेचे संचालक डॉ. जी. रवींद्र चारी, डॉ. एम. प्रभाकर, डॉ. जे. व्ही. एन. एस. प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
निक्रा म्हणजे राष्ट्रीय हवामान अनुकूल शेती नवकल्पना प्रकल्प असून तो देशातील १२१ हवामान संवेदनशील जिल्ह्यात २०११ पासून कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबविला जात आहे. या कृषी विज्ञान केंद्रांची वार्षिक आढावा कार्यशाळा हैदराबाद येथे ४ ते ६ जून या कालावधीत होत आहे. या कार्यशाळेचे औचित्य साधून हे पुरस्कार देण्यात आले.
बदलत्या हवामान परिस्थितीशी लढा देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने काय प्रयत्न केलेत व कोणते हवामान अनुकूल तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले, त्याचा किती शेतकऱ्यांना कशा प्रकारे फायदा झाला या निकषावर आधारीत प्रत्येक झोनमधून दोन कृषी विज्ञान केंद्रांना हे पुरस्कार देण्यात आले.
देशात एकूण ११ झोन आहेत. केव्हीके जालना हे हा पुरस्कार मिळणारे महाराष्ट्रातील एकमेव विज्ञान केंद्र आहे. बदनापूर तालुक्यातील कडेगाव आणि वरुडी या गावात कृषी विज्ञान केंद्राने रेशीम उद्योग, शेळीपालन, कुक्कुटपालन, शेततळे, हवामान अनुकूल वाणांचा प्रसार, भाडेतत्वावर अवजारे बँक, कापूस पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन, शेंदरी बोंडअळीचे नियंत्रण, विहीर पुनर्भरण तंत्रज्ञान, मोसंबीच्या बागा वाचविण्यासाठी केलेले प्रयत्न या बाबींची नोंद घेण्यात आली.
जालन्याच्या विज्ञान केंद्राला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्राचे अध्यक्ष तथा कृषीभूक्षण विजयअण्णा बाराडेंसह अन्य तज्ज्ञांचे सर्वत्र स्वागत होत आहे.