घोडे तो बहुत है बाजार मे...!; विधान परिषदेच्या मतदारांनी नाराज होऊ नये : दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 04:42 PM2019-08-12T16:42:55+5:302019-08-12T16:45:00+5:30
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा मतदारांशी खास शैलीत संवाद
- संजय देशमुख
जालना : औरंगाबाद- जालना स्थानिक विधान परिषदेची यंदाची निवडणूक चांगलीच चर्चेची ठरली आहे. युतीचे उमेदवार अंबादास दानवे आणि काँग्रेसचे उमेदवार बाबूराव कुलकर्णी यांनी संयुत्त पत्रक काढून घोडेबाजार न करता प्रमाणिकपणे मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले. या अनोख्या आवाहनाचे पडसाद रविवारी जालन्यातील बीज शीतल सिडस्च्या सभागृहात पार पडलेल्या युतीच्या बैठकीत उमटले.
अनेक जि.प. सदस्य तसेच नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त करून आम्ही प्रामाणिकपणे मतदान नेहमीच करतो, परंतु यंदा आम्हाला घोडे अर्थात खरेदीदार समजून आमचा अपमान झाल्याची भावना बोलून दाखवली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या खास शैलीत थेट १९९८ च्या पंतप्रधान वाजपेयींचे सरकार ज्यावेळी एका मताने पडले होते. त्याची आठवण करून देत ‘घोडे तो बहुत है बाजार मे.. लेकीन खरेदीदार नही’ असे म्हटल्याचे सांगून हशा पिकवला.
जालना जिल्हा परिषदेत शिवसेनेने जो राष्ट्रवादीसोबत घरोबा केला आहे, त्यात देखील लवकरात लवकर शिवसेनेने काडीमोड घ्यावा असा सूचक इशाराही उपस्थित राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडे कटाक्ष टाकत दिला. एकूणच आजची ही बैठक युतीचे उमेदवार अंबादास दानवेंना विजयी करण्यासाठीची व्युहरचना आखणारी ठरली. त्याच दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे उमेदवार बाबूराव कुलकर्णी यांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकरांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने अनेक तर्क- वितर्क लावले जात होते. आजच्या बैठकीत राज्यमंत्री खोतकरांनीही अंबादास दानवेंना विजयी करण्यासाठी शिवसेनेच्या मतदारांना व्हीप पाळण्याचे आवाहन केले. या निवडणूकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे. १९ रोजी निवडणूक होत आहे. त्याामुळे अंबादास दानवे आणि बाबूराव कुलकर्णींकडून मतदारांच्या वैय्यक्तीक भेटींवर भर देऊन संपर्क गतीमान केला आहे.
जालना जिल्ह्यातील मतदारांची संख्या
या निवडणुकीत जालना जि.प. ६४, भोकरदन पालिका २०, जाफराबाद नगरपंचायत १९, जालना न.प. ६७, बदनापूर नगरपंचायत १९, मंठा नगरपंचायत १९, घनसावंगी नगरपंचायत १९, परतूर पालिका २३ आणि अंबड पालिका २२ असे २७२ मतदार जालना जिल्ह्यात आहेत. त्यात जालना, भोकरदन, घनसावंगी, परतूर या काँग्रेसकडे असून, उर्वरित युतीकडे आहेत.